रस्ते सुरक्षा ही गंभीर बाब आणि रस्ते अपघात होऊच नयेत याबद्दल काटेकोर असणे आवश्यक – गडकरी

रस्ते सुरक्षा ही अतिशय गंभीर बाब असून रस्ते अपघात अजिबात होऊ नयेत यासाठी काटेकोर असले पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी केले. हिंदुस्थानातील मोटार सुरक्षा वातावरण यावरील पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की वर्ष 2025 पर्यंत रस्ते अपघातांचे प्रमाण निम्म्यावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. सुरक्षेची तरतूद वाढवण्याच्या दृष्टीने चार अतिरिक्त एअर बॅग आणि थ्री पॉईंट सीट बेल्ट आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

वाहनांची सुरक्षा अधिक सुधारण्यासाठी वाहनांची मानके आणि व्यवस्था यांच्यावर आधारित तारांकित गुणानुक्रम म्हणजेच स्टार रेटिंग देण्याची पद्धत प्रस्तावित आहे,असे त्यांनी सांगितले. त्यामुळे खरेदीदाराला त्या माहितीवर आधारित निर्णय घेता येईल, असे त्यांनी नमूद केले.

या प्रस्तावांतर्गत येणार्‍या इतर सुरक्षा पद्धतींविषयी बोलताना गडकरी यांनी इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, सुधारित इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टिम, धोकादायक मालाची वाहतूक, दिव्यांगांसाठी सुलभता, चालकाला झोप येत असल्यास लक्ष वेधणारी इशारा व्यवस्था, ब्लाइंड स्पॉट माहिती व्यवस्था, सुधारित चालक मदतनीस, लेन डिपार्चर इशारा व्यवस्था, आदींचा उल्लेख केला. आवाजाचे प्रदूषण कमी करणे आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर याच्या महत्वावर मंत्रीमहोदयांनी यावेळी भर दिला.

रस्ते सुरक्षा उपाय योजनांबद्दल सामूहिक जनजागृती ही काळाची गरज असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. यासाठी माध्यमे आणि लोकसहभागातून माहितीचा प्रसार होणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.