शिवसैनिकांचा प्रचंड जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी, खालापूर, माणगाव, पोलादपुरात शिवसेनेचे नगराध्यक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील 11 नगरपंचायतींची निवडणूक पार पडल्यानंतर आता नगराध्यक्ष निवडीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी पाहायला मिळाली. गुरुवारी झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत माणगाव,खालापूर आणि पोलादपुरात शिवसेनेचा भगवा फडकला. माणगावमध्ये शिवसेनेचे ज्ञानदेव पवार यांनी राष्ट्रवादीच्या रिया उभारे यांचा पराभव करत नगराध्यक्षपद पटकावले तर खालापूर नगरपंचायतीत शिवसेनेच्या रोशनी मोडवे आणि पोलादपूर नगरपंचायतीत शिवसेनेच्या सोनल गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेचे शिलेदार विजयी होताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड,शहापूर, पालघर जिल्ह्यातील तलासरी, मोखाडा, विक्रमगड आणि रायगड जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर आणि पाली नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबर आणि 18 जानेवारीला मतदान तर 19 जानेवारीला मतमोजणी झाली. 11 पैकी 8 नगरपंचायतीत शिवसेनेने वर्चस्व मिळवले. आता नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम सुरू झाला असून गुरुवारी माणगाव,खालापूर, पोलादपूर नगरपंचायतीत नगराध्यक्ष निवड झाली.

रोहा : माणगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर नगराध्यक्ष निवडणुकीतही वर्चस्व राखले. पीठासीन अधिकारी राहुल इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष निवडीची सभा घेण्यात आली. शिवसेनेचे ज्ञानदेव पवार यांनी राष्ट्रवादीच्या रिया उभारे यांचा 9 विरुद्ध 8 मतांनी पराभव केला. तर उपनगराध्यक्ष पदासाठी सचिन बोंबले यांनी शेकापच्या ममता थोरे यांचा 9 विरुद्ध 8 मतांनी पराभव केला.

खालापूर : खालापूर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक नगरपंचायत कार्यालयात पार पडली. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या रोशनी मोडवे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पारठे यांचीही बिनविरोध निवड झाली. खालापुरात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी झाल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला विरोधी बाकावर बसावे लागले. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा सल्लागार नवीन घाटवळ, जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजय पाटील, तालुकाप्रमुख संतोष विचारे आदी उपस्थित होते.

पोलादपूर : पोलादपूर नागरपंचायतीत शिवसेनेच्या सोनल गायकवाड यांची नगराध्यक्षपदी आणि नागेश पवार यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. 19 जागांपैकी 10 जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असल्याने निवडीची औपचारिकता होती. सोनल गायकवाड आणि नागेश पवार विजयी होताच शिवसैनिकांनी जल्लोष केला. यावेळी आमदार भरत गोगावले, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख नीलेश अहिरे, शहरप्रमुख प्रकाश गायकवाड, सुरेश पवार, अश्विनी गांधी, नीलेश सुतार, उमेश पवार उपस्थित होते.

शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचे अभिनंदन केले. यापुढे रायगड नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये भगवा फडकेल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार भरत गोगावले, राजीव साबळे, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, प्रमोद घोसाळकर, समीर शेटो उपस्थित होते.