
टेनिस कोर्ट गाजवून झाले आणि आता हिंदुस्थानी टेनिस संघटनेत मोठे बदल घडवण्याचे मनाशी ठरवले आहे ते हिंदुस्थानचा दिगज्ज खेळाडू रोहन बोपण्णाने. रोहनने टेनिसचे मैदान दणाणून सोडले होते. सध्या रोहनकडे कर्नाटक राज्य लॉन टेनिस असोसिएशनचे उपाध्यक्षपद आहे. त्यामुळे राष्ट्रीय संघटनेवर जाण्याचा त्याचा मानस आहे. रोहनने किया टेनिस प्रीमियर लीगच्या कार्यक्रमात आपले हे मनसुबे बोलून दाखवले. काही दिवसांत संघटनेची निवडणूक होणार आहे, त्यापूर्वी रोहनने ही गर्जना केली आहे.
रोहन म्हणाला की, ‘निवडणुका येत आहेत, आणि जर हिंदुस्थानी क्रीडा क्षेत्रात परिवर्तन घडवण्याची संधी मिळाली आणि मला त्याचा भाग होता आले तर मला त्यात सहभागी व्हायला खूप आनंद होईल. हिंदुस्थानी टेनिसच्या विकासात खऱया अर्थाने बदल घडवण्याचा माझा मानस आहे. जर माझ्याकडून टेनिससाठी काही होत असेल तर खेळासाठी ती गोष्ट मी करायला हवी.’ किया आणि टेनिस प्रीमियर लीग यांच्या कार्यक्रमात रोहनसह हिंदुस्थानचे दिग्गज टेनिसपटू लिएण्डर पेसही उपस्थित होते. रोहन यांनी यावेळी स्पर्धेत खेळण्यासाठी फिटनेस किती महत्त्वाचा आहे, यावरही भाष्य केले.
रोहन म्हणाला की, ‘एकेरीच्या तुलनेत दुहेरी खेळात लक्षणीय सुधारणा होत आहे. माझे मत आहे की, आपल्याकडे जे नाही त्याची चिंता करण्याऐवजी, आज आपल्याकडे असलेल्या खेळाडूंना आपण पाठिंबा दिला पाहिजे. आता टेनिस प्रीमियर लीगचाही मी विचार करत आहे. पण त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही तंदुरुस्ती असते. त्यामुळे या हंगामापूर्वी तंदुरुस्त राहण्याचा मी प्रयत्न करत आहे. ’



























































