रोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे

1694

rokhthokगोवा मुक्तीसाठी ज्यांनी सशस्त्र बंड केले व त्यासाठी लिस्बनच्या तुरुंगात ‘काळे पाणी’ भोगले ते मोहन रानडे निघून गेले. राजकारणासाठी नेत्यांचे उंच उंच पुतळे उभारले जातात, असे पुतळे उभारणाऱ्यांना मोहन रानडे यांची उंची कधीच समजणार नाही. जुल्मी पोर्तुगीज सत्तेविरुद्ध लढणारा अखेरचा वीरही काळाच्या पडद्याआड गेला.

खऱया स्वातंत्र्यसैनिकांची पिढी आता उरली नाही. पुन्हा फक्त स्वातंत्र्यसैनिक म्हणून सरकारी पेन्शन आणि ताम्रपट घेणारा वर्ग वेगळा. क्रांतिकार्य करणारे, फासावर जाणारे, हातात बॉम्ब आणि शस्त्र घेऊन ती देशाच्या शत्रूंवर चालवणारे दुसरे. मोहन रानडे हे दुसऱया पंथातले. गोवा मुक्ती लढय़ात पोर्तुगीज राजवटीविरुद्ध सशस्त्र बंड करणारे मोहन रानडे यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. (25 जून 2019) ते अलगदपणे गोव्याच्या स्वातंत्र्यलढय़ात उतरले. पंधरा वर्षांचा सश्रम तुरुंगवास पोर्तुगीजांच्या लिस्बन तुरुंगात भोगला व तितक्याच सहजतेने कोणताही बडेजाव न मिरवता कायमचे निघून गेले. गोव्याचा हा स्वातंत्र्यसैनिक शेवटी पुण्यात स्थायिक होण्यास आला. आयुष्यातील उमेदीची 15 वर्षे त्यांनी पोर्तुगीजांच्या तुरुंगात काढली होती. त्यापैकी पाच वर्षे त्यांना एका लहानशा कोठडीत एकांतवासात ठेवले. कुणाशी बोलणे नाही, कुणाचे ऐकणे नाही. त्यामुळे नंतरच्या काळात तर ते मूकच झाले. नंतर रानडे पुण्यात आले. टेलिफोन मिळविण्यासाठी अर्ज घेऊन ते पुणे टेलिफोन कार्यालयात गेले. तेथे घडलेला संवाद-

‘‘मी मोहन रानडे.’’
‘‘कोणत्या खात्यात काम करता?’’
‘‘सध्या कुठेच नाही.’’
‘‘बरं मग…?’’
‘‘मला टेलिफोन हवा.’’
‘‘कोणत्या गटातील?’’
‘‘स्वातंत्र्यसैनिक या गटातील.’’
‘‘कोठले प्रमाणपत्र आहे?’’
‘‘गोव्याचे.’’
‘‘मग गोव्यात तुम्हाला फोन दिलाच असेल.’’
‘‘मग स्वातंत्र्यसैनिक म्हणून एकदाच टेलिफोन मिळू शकतो?’’
‘‘होय.’’
‘‘माझा गोव्याचा फोन इथे बदलून द्या.’’
‘‘ते राज्य वेगळे. त्यासाठी तुम्ही गोव्यात खटपट करा, इथे नाही.’’

देशाच्या स्वातंत्र्यासाठी व गोव्याच्या मुक्ततेसाठी शरीरावर गोळय़ा झेलणारे व पंधरा वर्षे तुरुंगवास भोगणारे मोहन रानडे. देश त्यांना विसरला. कारण त्यांनी केलेल्या शौर्याचा, देशसेवेचा बडेजाव मिरवला नाही.

देशाचा संग्राम
गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम हा देशाचा स्वातंत्र्यसंग्राम होता. 1947 साली हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यावर आपल्याला आता हिंदुस्थान सोडावा लागेल असे पोर्तुगीज हुकूमशहा सालाझार याला वाटत होते; परंतु तसे घडले नाही. 1947 साली हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यावरही गोवा चौदा वर्षे पारतंत्र्यात राहिला. तो स्वतंत्र झाला तो मोहन रानडे, पी. के. काकोडकर, रामा हेगडे अशा असंख्य क्रांतिकारकांमुळे. या क्रांतिकारकांतील अखेरचा दुवा मोहन रानडे यांच्या रूपाने आता निखळला. रानडे यांचे मूळ नाव मनोहर आपटे. ते सांगलीचे. कमालीचे सावरकरभक्त.

1946 मध्ये तेव्हाच्या पूर्व बंगालमधल्या नौखालीत जातीय दंगा पेटला. सांगली सोडून नौखालीत जाऊन काम करण्याचा निर्णय तरुण मोहन रानडे व त्यांच्या मित्रांनी घेतला. ते मुंबईस पोहचले. त्यांनी वीर सावरकरांची भेट घेतली. ‘‘नौखालीत आता जाऊ नका,’’ असा सल्ला सावरकरांनी त्यांना दिला. आधी शिक्षण पूर्ण करा, मग राष्ट्रीय व राजकीय कार्यात उडी घ्या असे सांगितले. या तरुणांनी निरोप घेताना सावरकरांनी त्यांना एक संदेश दिला. सावरकर म्हणाले, ‘‘शत्रूने निवडलेल्या रणांगणावर आपण जायचे नसते. आपल्या सोयीनुसार रणांगणे निर्माण करायची असतात आणि त्या ठिकाणी शत्रूला येण्यास भाग पाडायचे असते.’’ ही सर्व मुले पुन्हा सांगलीस परतली.

जंगलातले युद्ध
1948 मध्ये डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोव्यात सत्याग्रह केल्याची बातमी मोहन रानडे यांनी वृत्तपत्रांत वाचली. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यावर केवळ 24 तासांत गोव्यातही तिरंगा फडकेल, असे काँग्रेस नेते स. का. पाटलांनी सांगितले होते, पण तसे घडले नाही. गोव्याच्या हातापायातील परकीय बेडय़ा पाहून सांगलीच्या रानडय़ांना दुःख झाले. मागचा-पुढचा विचार न करता ते थेट गोव्याच्या दिशेने रवाना झाले. पोर्तुगीज अमलाखालचा गोवा तेव्हा सुस्तावल्यासारखा पडून होता. गोव्यात येऊन त्यांनी काम सुरू केले, पण त्यांच्या नावाने सरकारकडे चुगली झाली. सांगलीचा मनोहर आपटे नावाचा मुलगा धारगळमध्ये आला असून तो पोर्तुगीज सरकारविरुद्ध लोकांना भडकवीत असल्याचे कळवले. पोलीस मागे लागले तेव्हा आपटे महाराष्ट्राच्या हद्दीत आले आणि मोहन रानडे असे नाव धारण करून पुन्हा गोव्यात परतले. सत्तरी तालुक्यातील डोंगराळ, घनदाट जंगलात राहिले. तिथून त्यांनी पोर्तुगीज पोलिसांशी युद्ध सुरू केले.

शिक्षक रानडे
रानडे यांनी शिक्षकी पेशा पत्करून त्यातून मिळणाऱया पैशांतून एक रिव्हॉल्व्हर घेतले. सांगलीतून येताना एक डबल बॅरलची विनापरवाना बंदूक आणली होती. रानडे यांनी गोव्यात ‘जय हिंद’ चळवळ सुरू केली. रानडे व सहकाऱयांनी पणजीचे आकाशवाणी केंद्र उडवायचे ठरवले. पण आवश्यक ती साधने व स्फोटके मिळाली नाहीत. नंतर आझाद गोमांतक दलाची स्थापना केली. रानडे व त्यांच्या क्रांतिकारक सहकाऱयांनी म्हापशातील सरकारी खजिन्यावर हल्ला केला. ‘आझाद गोमांतक दल’ हे एक सैन्यच होते व सैन्याप्रमाणे त्यांच्या कवायती वगैरे चालत. यात गनिमी व डोंगरी युद्धपद्धतीचे शिक्षण तरुणांना दिले जात असे. 13 एप्रिल 1955 या दिवशी आझाद गोमांतक दलाच्या वीरांनी कुंकळ्ळीच्या मुख्य पोलीस चौकीवरच हल्ला करून पोर्तुगीज सरकारला हादरा दिला. रानडय़ांवर वीर सावरकरांचा प्रभाव होता व रणाशिवाय गोवा स्वतंत्र होणार नाही, हा त्यांचा दावा होता. सावरकरांनी ज्याप्रमाणे घरातील अष्टभुजा देवीसमोर शपथ घेतली होती तशीच शपथ आझाद गोमांतक दलाच्या क्रांतिकारकांनी घेतली होती. त्यात मोहन रानडे होते. हिंदुस्थानच्या ध्वजासमोर विश्वनाथ लवंदे यांनी सर्व क्रांतिकारकांना शपथ दिलेली ती अशी-

‘‘दीव, दमण, गोवा हे भारताचे अविभाज्य भाग आहेत. पोर्तुगीज साम्राज्यशाहीला तेथून कोणत्याही मार्गाने हुसकावून लावून या वसाहतीचे भारतात पुनश्च विलीनीकरण घडवून आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्यासाठी मी सर्वस्वाचा होम करीन. माझ्या सहकाऱयांशी आणि दलाशी कधीही प्रतारणा करणार नाही. जय हिंद!’’

पोलिसांवर हल्ले
मोहन रानडे व त्यांच्या सहकाऱयांची धास्तीच पोर्तुगीज सरकारने घेतली. रानडे यांनी अनेकदा पोर्तुगीज पोलिसांवर सशस्त्र्ा हल्ले केले. ते स्वतःही जखमी झाले. 26 ऑक्टोबर 1955 च्या संध्याकाळी मोहन रानडे व त्यांच्या सहकाऱयांनी बेती पोलीस चौकीवर सशस्त्र्ा हल्ला केला. रानडे यांच्या हातात तेव्हा स्टेनगन होती. गोव्यातील हे क्रांतिकारक पोर्तुगीज पोलिसांशी अनेकदा आमनेसामने लढत होते. पोर्तुगीज पोलिसांनी झाडलेल्या गोळय़ांमुळे रानडे जखमी झाले. बेशुद्धावस्थेतील रानडे यांना अटक झाली. त्याच अवस्थेत त्यांच्या हातापायात बेडय़ा ठोकल्या गेल्या. एवढे पोर्तुगीजांना रानडे यांचे भय वाटत होते.

लिस्बनचे ‘काळे पाणी’
रानडे यांच्यासह अनेक बंद्यांना अटक करून लिस्बनच्या तुरुंगात पाठवले. त्यातील पी. के. काकोडकर व रामा हेगडे हे स्वातंत्र्यवीर मला माहीत आहेत. 19 डिसेंबर 1961 या दिवशी गोवा मुक्त झाला. पण रानडे हे तेव्हाही बंदिवासात होते. ते परकीय भूमीवरील कैदेत होते. रानडे यांच्या मुक्ततेसाठी सुधीर फडके यांनी एक समिती स्थापन केली. 23 जानेवारी 1968 या दिवशी रानडे सुटले. 23 जानेवारी हा शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस. रानडे यांच्या सुटकेचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वागत केले. मुंबईत तेव्हा शिवसेनेचे आंदोलन सुरू होते.

पण रानडे विमानाने मुंबईत उतरणार होते. मातृभूमीसाठी पंधरा वर्षे सावरकरांसारखाच कारावास भोगणाऱया या स्वातंत्र्यवीराचे पाय मायभूमीस लागावेत, कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सुधीर फडके यांनी शिवसेनाप्रमुखांशी चर्चा केली. शिवसेनेने आंदोलन थोडे शिथिल केले. रानडे यांचे मुंबईत आगमन झाले. नंतर ते शिवसेनाप्रमुखांना जाऊन भेटले, हा इतिहास आहे.

रोमांचक आणि थरारक
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढय़ाइतकाच गोव्याचा स्वातंत्र्यलढा रोमांचक होता. त्याविषयी देशाला कमी माहिती आहे. या लढय़ालाही रानडे यांच्याप्रमाणे अनेक वीर सावरकर होते. भगतसिंग, राजगुरूसारखे तेथील स्थानिक क्रांतिकारक होते. गोव्यात हुकूमशहा सालाझारचा पराभव झाला तो मोहन रानडे, काकोडकर, रामा हेगडे यांच्यासारख्या असंख्य क्रांतिवीरांमुळेच. अनेक जण फासावरही गेले. गोव्याचा शेवटचा पोर्तुगीज गव्हर्नर मॅन्युअल ऍण्टोनिओ व्हॉस्सॉल्लो ई सिल्व्हा याने शरणागती पत्करली व त्यास सुरक्षितपणे परत जाऊ देण्याची व्यवस्था हिंदुस्थान सरकारने केली. त्या वेळी आपले मोहन रानडे पोर्तुगालच्या तुरुंगात आहेत, त्यांना बदल्यात सोडून आणावे याचे स्मरण कुणालाच झाले नाही. रामा हेगडे यांचेही विस्मरण होऊ नये. हा मुंबईकर मराठी माणूस. त्यांचा दवाखाना गिरगावात होता. लोकप्रिय डॉक्टर म्हणून ते ओळखले जात; परंतु मातृभूमीचा एक भाग पारतंत्र्यात आहे या वेदनेने सर्वकाही सोडून रामा हेगडे श्री. पुरुषोत्तम काकोडकर यांच्याबरोबर गोव्याच्या सत्याग्रहात उतरले आणि त्यांना पंधरा वर्षांची शिक्षा झाली. इतकेच नव्हे तर, त्यांनाही लिस्बनच्या तुरुंगात नेऊन ठेवले. लिस्बनच्या अनेक तुरुंगांत राहिलेले रामा हेगडे एक दिवस मुक्त झाले; परंतु त्यांना लिस्बन सोडण्याची परवानगी नव्हती. डॉ. हेगडे मुक्त होऊन लिस्बनच्या रस्त्यावर आले तेव्हा ते कोणीही नव्हते. नोकरी नव्हती, काम नव्हते व जीवनाच्या नव्या संघर्षाला ते सामोरे गेले. गोवा स्वतंत्र झाल्यावर ते गोव्याला आले व ‘गोमांतकवादी’ हे मराठीवादी दैनिक सुरू करायला त्यांनी काही जुन्या सहकाऱयांना भाग पाडले. गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा व मराठी संस्कृती टिकावी हे त्यांनी स्वप्न पाहिले. पण बांदोडकरांशी त्यांचे मतभेद झाले व हेगडे पुन्हा लिस्बनला परतले ते कायमचे.

हेगडे व काकोडकर
रानडे, हेगडे यांच्याप्रमाणे पुरुषोत्तम काकोडकरही गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी झुंजले. मी रानडे यांना वीर सावरकरांची उपमा देत आहे, तर पी. के. काकोडकर व त्यांच्या कुटुंबीयांना क्रांतिकारक चापेकर बंधूंची उपमा देईन. स्वतः पुरुषोत्तम काकोडकर हे गोवा मुक्ती संग्रामातले बिनीचे शिलेदार. काकोडकरांची दुसरी ओळख देतो. विख्यात अणुऊर्जा शास्त्र्ाज्ञ आणि भाभा अणुशक्ती केंद्राचे माजी प्रमुख अनिल काकोडकर यांचे ते वडील. काकोडकरांच्या क्रांतिकार्यामुळे व प्रदीर्घ तुरुंगवासामुळे त्यांच्या कुटुंबाची फरफटच झाली. काकोडकर यांचा गोव्यात प्रेसचा व्यवसाय होता. काकोडकरांची पिढी पारतंत्र्यांचे जोखड झुगारून देण्यासाठी पोर्तुगीजांविरुद्ध लढय़ात उतरली. हे तीनही सख्खे काकोडकर बंधू तुरुंगात गेले. त्यातील पी. के. काकोडकर हे भूमिगत क्रांतिकारकांचे नेतृत्व करीत होते. एक दिवस ते पोर्तुगीजांच्या हाती लागले व पोर्तुगीजांनी काकोडकरांना उचलून सरळ लिस्बनच्या तुरुंगात नेऊन डांबले. पी. के. काकोडकरांचे काय झाले, कुठे गेले हे शेवटी कुणालाच समजेना. त्यांचा शोध शेवटी लिस्बनला लागला. किमान दहा-दहा, पंधरा-पंधरा वर्षांच्या शिक्षा या सगळय़ांना ठोठावल्या गेल्या. हे तसे ‘काळे पाणी’च होते. मोहन रानडे, पी. के. काकोडकर, रामा हेगडे यांच्यासारख्या असंख्य क्रांतिकारकांनी ते भोगले. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, गोव्याचा स्वातंत्र्यलढा हा ब्रिटिशांशी झालेल्या लढय़ासारखा नव्हता. निःशस्त्र्ा सत्याग्रहींवर सरळ गोळय़ा घालणाऱयांविरुद्धचा तो लढा क्रौर्याने भरलेला होता. तरीही अनेक क्रांतिकारक पोर्तुगीजांच्या क्रूर राजवटीविरोधात बेडरपणे लढले. पोर्तुगीजांच्या पाशवी वृत्तीच्या सत्तेविरोधात लिस्बनला अनेकांनी जन्मठेपा भोगल्या. त्या सगळय़ांचे किती स्मरण आज आपण ठेवतो?

मोहन रानडे हा शेवटचा दुवाही आता निखळला. एक तरुण सांगलीतून निघाला. गोव्याच्या परक्या अमलाखालील भूमीत तो पोहोचला. परकीय सत्तेशी झुंजला. शेवटी लिस्बनच्या अंधारकोठडीत पोहोचला व पुण्यात येऊन अखेरचा श्वास घेतला. देशात आणि राज्यात सत्तेची वतनदारी करणाऱयांना मोहन रानडे कोण, असा प्रश्न पडला असेल. रानडे यांच्या मृत्यूची बातमीही त्यांच्या नजरेतून सुटली असेल. निवडणुका जिंकणे म्हणजे देश जिंकणे या भ्रमात आपण वावरतो. रानडे व त्यांच्या सहकाऱयांनी ब्रिटिशांपेक्षाही निर्घृण पोर्तुगीज हुकूमशहांशी लढा देऊन देश विजयी केला होता. नेत्यांचे उंच पुतळे बांधणाऱयांना रानडे, सावरकर, रामा हेगडे, पी. के. काकोडकरांच्या कार्याची उंची कधीच समजणार नाही!

Twitter : @rautsanjay61
Gmail : [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या