रोखठोक – सर्वच सीमा अशांत! बाहुबली राजकारणाची हवा निघाली!

18246

rokhthokहिंदुस्थानच्या सर्व सीमा अशांत आहेत. आपल्या सीमेवरची बहुतेक राष्ट्रे चीनची मांडलिक आहेत. त्या चीननेही आता आमच्यावर आक्रमण केले! परराष्ट्र व संरक्षणविषयक चुकलेल्या धोरणाचे हे फलित आहे. अमेरिकेचे ट्रम्पही उद्या निवडणूक हरतील. मोदींच्या बाजूने आता कोण उभे राहील? चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली.

हिंदुस्थानसारख्या देशात अधूनमधून कसल्या ना कसल्या तरी लाटा येतच असतात. कोरोनाच्या लाटेचा जोर कायम असतानाच देशात चीनविरोधी संतापाची लाट उसळली आहे, पण काही संताप हे षंढ असतात. असे षंढ संताप चीनच्या बाबतीत अनेकदा निर्माण झाले आहेत. मार्च 2016ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा क्युबाच्या भूमीवर उतरले तेव्हा जगाला आश्चर्य वाटले. पन्नास वर्षे अमेरिका व क्युबाचा संवाद नव्हता. पन्नास वर्षांत प्रथमच अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष क्युबाच्या भूमीवर अवतरला होता. क्युबाचे क्रांतिकारी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो हे अमेरिकेला कट्टर दुश्मन मानत. अमेरिकेने त्या पन्नास वर्षांत कॅस्ट्रो यांना मारण्याचा 634 वेळा प्रयत्न केला. त्या काळात अनेक राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत आले व गेले, पण कॅस्ट्रो क्युबाचे सत्ताधीश म्हणून कायम राहिले. वयोपरत्वे फिडेल कॅस्ट्रो अधिकारी पदावरून दूर झाले. नवे राष्ट्राध्यक्ष राऊल कॅस्ट्रो हे झाले. त्यांच्या काळात ओबामा यांनी क्युबाला भेट दिली. ओबामा क्युबाविषयी भरभरून बोलले. सर्व वाद मिटवायची भाषा केली. तेव्हा क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो यांनी त्यांच्या बंद खोलीतून एकाच ओळीचे निवेदन प्रसिद्ध केले. ‘‘अमेरिकेला क्युबाविषयी आलेला हा प्रेमाचा उमाळा पाहून क्युबाच्या जनतेला हार्टअटॅक येईल.’’ कॅस्ट्रोंनी योग्य बाण मारला. ओबामा अस्वस्थ झाले. या प्रसंगाचा संदर्भ द्यायचे कारण इतकेच की, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग दोन वर्षांपूर्वी अहमदाबादेत पंतप्रधान मोदींचे खास पाहुणे म्हणून आले होते. सर्व वाद मिटतील असे ते म्हणाले होते, पण तेव्हाही माझ्या मनात तेच विचार आले जे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांबाबत फिडेल कॅस्ट्रो यांच्या मनात आले होते. या लोकांवर विश्वास ठेवता येत नाही. चार दिवसांपूर्वी लडाखच्या हद्दीत जो रक्तरंजित संघर्ष झाला तो पाहिल्यावर चीनचा खरा चेहरा पुन्हा उघडा पडला!

1975 नंतर प्रथम

हिंदुस्थान व चिनी सैनिकांची लडाखच्या हद्दीत झटापट झाली. त्यात आपल्या बाजूचे 20 जवान मारले गेले. चीनचे किती नुकसान झाले ते अधिकृत कळले नाही. चीन आणि हिंदुस्थानात सीमावाद आहे. 3 हजार 488 किलोमीटर वादग्रस्त सीमेवरून 1975 पासून अनेकदा अशा चकमकी झाल्या, पण एकाच वेळी आपले 20 सैनिक मारले जाण्याची ही पहिलीच घटना आहे. 1975 मध्ये चिनी सैनिकांनी आसाम रायफल्सच्या चार जवानांची हत्या केली होती. त्यानंतर वाद आणि झटापटी होत राहिल्या, पण दोन्ही बाजूंनी बंदुका चालल्या नाहीत. आताही 20 जवानांची हत्या बंदुका-बॉम्बने नव्हे तर दगड, विटा, लोखंडी पाइप, तारांचा वापर करून झाली. बंदुका चालवायच्या नाहीत हा आदेश दोन्ही बाजूंच्या सैनिकांनी पाळला, पण एकमेकांचे बळी घेण्यासाठी अश्मयुगातील हत्यारे वापरली. लडाखची सीमा सैनिकांच्या रक्ताने लाल झाली.

बदला कसा घेणार?

चीनने आपले 20 सैनिक मारले. त्याचा बदला मोदी सरकार कसा घेणार, हाच खरा सवाल आहे. की बदला घेण्यासाठी, सर्जिकल स्ट्राइक करून विजयी डंका पिटण्यासाठी पाकिस्तान हा राखीव ठेवला आहे? 20 जवानांच्या हत्येचा बदला मोदी सरकारने घेतला नाही तर ती आपली सगळय़ात मोठी मानहानी ठरेल. 1962चे चीनबरोबरचे युद्ध नेहरूंच्या धोरणांमुळे हरलो हा डंका भाजपला आता पिटता येणार नाही. गलवान व्हॅलीत चीनचे सैन्य घुसले व आज गलवान व्हॅली चिनी सैनिकांच्या कब्जात आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी दुपारी अधिकृतपणे जाहीर केले की, ‘गलवान व्हॅली हा चीनचाच भूभाग आहे.’ यावर हिंदुस्थानकडून कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. मोदी सरकारने तटस्थतेचे धोरण सोडून अमेरिकेच्या जास्त कच्छपी लागण्याचे धोरण स्वीकारले व सीमेवरचा चीन जास्त आक्रमक झाला हे येथे लक्षात घेतले पाहिजे. हिंदुस्थानच्या सीमेवरील बहुतेक सर्व राष्ट्रे आज चीनची मांडलिक आहेत. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका ही राष्ट्रे चीनच्या मदतीवर जिवंत आहेत व चीनच्या इशाऱयावर हिंदुस्थानला आव्हान देत आहेत. महासत्ता अमेरिकेशी मैत्री वगैरे ठीक, पण सीमा अशांत राहिल्या तर महासत्ता काय करणार? अमेरिकेसाठी निकटचा शेजारी असलेल्या चीनशी भांडण करणे ही परराष्ट्र व संरक्षणविषयक नीती असू शकत नाही. दुर्दैवाने आज तेच घडताना दिसत आहे.

व्यापार सुरूच!

आज स्थिती अशी आहे की, सीमावाद पेटलेला असताना आपला चीनबरोबर व्यापार सुरू आहे. 20 जवानांना मानवंदना म्हणून चिनी वस्तूंवर बहिष्काराची घोषणा तरी आपल्या पंतप्रधानांनी करायला हवी, पण तेही झालेले नाही. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांत आपण आपल्या देशाच्या सीमा धड ठरवू शकलो नाहीत. चीनने हिंदुस्थानवर 1962 मध्ये हल्ला करीपर्यंत आपल्या उत्तर सीमांची आपल्याला नीट माहितीच नव्हती. जी मॅकमोहन रेषा माहीत होती ती फक्त नकाशावर होती. प्रत्यक्षात त्या बर्फाळ भूभागात आपण कधी गेलोच नव्हतो. तिबेटवर आपण स्वातंत्र्यपूर्व काळातच तुळशीपत्र ठेवले होते. तिबेट जोपर्यंत स्वतंत्र होते तोपर्यंत हिंदुस्थान-चीन सीमावाद निर्माण झाला नव्हता. तिबेट गेले आणि चीनची सेना आपल्या दारात येऊनच उभी राहिली. ‘हिंदी-चिनी भाई भाई’ या घोषणेचा चीनने काढलेला अर्थ असा होता की, चीनने गिळलेल्या प्रदेशावर आता तुम्ही कधीच हक्क सांगू नका. अरुणाचल, तवांग सीमेवर तेव्हाही चिनी सैनिक घुसखोरी करीतच होते. 1962 नंतर चीनशी नीट संवाद झाला नाही. वाजपेयी हे ‘जनता’ काळात परराष्ट्रमंत्री झाले व बीजिंगला गेले. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान म्हणून चीनला गेले. त्यांच्या शिष्टमंडळात अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्षनेते म्हणून गेले. त्या दौऱयात पत्रकारांनी वाजपेयींना प्रश्न केला होता, ‘‘1962 मध्ये चीनने आक्रमण केले तेव्हा तुमची जी भूमिका या सीमाप्रश्नाबद्दल होती ती आज आहे काय?’’

वाजपेयींनी सरळ नकारार्थी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘तेव्हा आम्हाला काहीच माहिती नव्हती. आमचा प्रदेश चीनने घेतला इतकेच आम्ही समजलो.’’ आणि मग पत्रकारांना खासगीत म्हणाले, ‘‘जो भाग आम्ही आमचा समजत होतो तिथे प्रत्यक्षात आम्ही कधीच गेलो नव्हतो.’’ वाजपेयींचे हे उत्तर प्रामाणिक होते. आम्हाला आमच्या सीमारेषाच माहीत नाहीत व त्या सीमांच्या रक्षणासाठी देश बलिदान देत आहे. गलवान व्हॅलीत चिनी सैन्य आले. आपल्या सैन्याने प्रतिकार केला. चीन म्हणते, हा सर्व भाग आमचाच. उलट तुम्हीच घुसखोरी केली. यावर आम्ही तसे चूप बसलो आहोत.

हवा निघाली

पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अमेरिकेचे प्रे. ट्रम्प यांच्याही बाहुबली राजकारणाची हवा लडाख, गलवान व्हॅली प्रकरणात निघाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक महिन्यापूर्वीच शंका उपस्थित केली होती की, चीनचे सैन्य लडाखमध्ये आपल्या भूभागात घुसले आहे. मोदी यांनी देशाला सत्य सांगावे. गांधी जे बोलत होते ते सत्य होते व पराभव लपविण्यासाठी गांधी यांना खोटे पाडले गेले. हिंदुस्थानचे वीस सैनिक चीनबरोबरच्या झटापटीत हुतात्मा झाले. अनेक सैनिक बेपत्ता आहेत. ते याच झटापटीत खोल गलवान व्हॅलीत कोसळून मरण पावल्याची भीती आहे. आपला एकही सैनिक चीनचा बंदी नाही असे आधी सांगण्यात आले. प्रत्यक्षात आपले 10 सैनिक चीनचे बंदी झाले. त्यांना नंतर चीनने सोडून दिले. हे चीनचे आक्रमण आहे व सरकार त्या आक्रमणाचा प्रतिकार करू शकले नाही. सरकारने या प्रकरणातल्या अनेक गोष्टी लपवून ठेवल्या, त्या आता उघड होत आहेत. पाकिस्तानचे सैन्य कारगिलपर्यंत पोहोचले हे समजताच पंतप्रधान वाजपेयींनी युद्धच पुकारले. लडाख, गलवान व्हॅली चीनच्या जबडय़ात गेली व आपण सुटकेचा मार्ग शोधत आहोत. आता ट्रम्पही निवडणूक हरतील अशी स्थिती आहे. ट्रम्पसाठी चीनला दुखवून काय साध्य केले?

गडबड, गोंधळ सीमेवर नसून दिल्लीतच आहे, असे फार पूर्वी मोदी म्हणाले होते, ते आता पटले!

चीनशी आपले भांडण न संपणारे आहे; कारण या भांडणाचा सरळ संबंध आपण अमेरिकेशी ठेवलेल्या संबंधांशी आहे. भविष्यकाळातही चीन हाच आपला मुख्य दुश्मन राहणार आहे. त्यामुळे हिमालयाचा दुर्गम आणि अति उंच परिसर हेच आपले खरेखुरे युद्धक्षेत्र आहे. पाकिस्तान हा चीनच्या मानाने अगदी दुय्यम शत्रू आहे. म्हणून लष्करी सिद्धतेचा विचार करताना पाकिस्तानला फाजील महत्त्व द्यायचे अजिबात कारण नाही. पाकिस्तानशी युद्ध झालेच तर ते परिचित भूभागावरून होणार असल्यामुळे हिंदुस्थानी सैनिक तेथे मुळीच कमी पडणार नाहीत, पण चीनच्या बाबतीत तसे म्हणता येणार नाही. गलवान व्हॅलीत आपण खाली खोल कोसळलो आहोत. त्यातून बाहेर पडावे लागेल. पंतप्रधान मोदींबरोबर देश उभाच आहे, पण ते देशाचे ऐकणार आहेत काय?

Twitter- @rautsanjay61
Email- [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या