मराठा आरक्षणासाठी 23 सप्टेंबरला कोल्हापुरात गोलमेज परिषद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या 23 सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे. मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 1 ऑक्टोबरपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास राज्यातील आमदार, खासदारांच्या पुतळय़ांचे प्रतीकात्मक दहन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

मराठा आरक्षणासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मराठा बांधवांनी अनेक मोर्चे काढले. पन्नासपेक्षा जास्त बांधवांनी बलिदान दिले. त्यानंतर मिळालेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने मराठा समाजात असंतोष निर्माण झाला आहे. आरक्षणासाठी लढा सुरूच राहील असा निर्धार सर्वांनी केला असून त्याची पुढील दिशा या गोलमेज परिषदेत ठरेल असे सुरेश पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱयांना घेराव घालणार

मराठा आरक्षणासाठी जिल्हाधिकाऱयांना घेराव घालण्यात येईल अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मराठा समाजात प्रचंड नाराजी असून या आंदोलनाची दखल घेतली न गेल्यास भविष्यात तीव्र पडसाद उमटतील असा इशाराही त्यांनी दिला.

आमदार, खासदारांनी भूमिका जाहीर न केल्यास पुतळे जाळणार

मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील मराठा आमदार आणि खासदारांनी 1 ऑक्टोबरपर्यंत समाजासमोर आपली भूमिका जाहीर करावी अन्यथा त्या सर्वांच्या पुतळ्याचे दहन केले जाईल, असा इशारा यावेळी आरक्षण समितीचे समन्वयक विजय महाडिक यांनी दिला. चंद्रकांत भराट, भरत पाटील, भास्करराव जाधव, चंद्रकांत पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते.