
सामना ऑनलाईन। श्रीनगर
देशभरात ईद साजरी होत असतानाच काही समाजकंटकांनी जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर तुफान दगडफेक केली. श्रीनगरमधील जामिया मशिदीत ईद निमित्त शेकडो लोक जमा झाले होते. नमाज पठणानंतर लोकं बाहेर आली. त्यानंतर त्यांनी या भागात ड्यूटीवर तैनात असलेल्या जवानांवर जोरदार दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी दहशतवादी झाकिर मूसा व आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेल्या मसूद अझहरचा लोकांनी जयजयकार केला. तसेच त्यांचे पोस्टर्स झळकावले. एवढेच नाही तर ‘कश्मीर बनणार पाकिस्तान’ असे पोस्टर्सही झळकावले. या दगडफेकीत जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, पुलवामा येथे जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला.
या जमावाला आवर घालण्यासाठी जवानांनी त्यांना माघारी जाण्यास सांगितले. पण तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते समोरून जवानांच्या दिशेने चालून येवू लागले. हे पाहताच इतर नागरिकांनी घराच्या दिशेने पळ काढला. त्यानंतर बघता बघता रस्त्यावर दगडफेक करणाऱ्या मुलांची संख्या वाढली. यावेळी हे तरुण इसिसचे पोस्टर्स घेऊन घराबाहेर पडत होते.
समाजकंटक मोठया संख्येने रस्त्यावर उतरले. त्यांनी कोंडाला रुमाल बंघले होते. त्यांच्या हातात मूसा आर्मी लिहिलेले पोस्टर्स पकडले होते. तर काहीजणांच्या हातात इसिसचे झेंडे होते. हे तरुण पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देऊ लागले. त्यानंतर अचानक त्यांनी जवानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात अनेक जवान जखमीही झाले आहेत.
कश्मीर बनवणार पाकिस्तान
काही नागरिक घोषणाबाजी करत इमारतीच्या गच्चीपर्यंत पोहचले होते. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला.
दरम्यान, पुलवामा येथील काकापोरा येथे बुधवारी दहशतवाद्यांनी एका महिलेवर गोळ्या झाडून तिची हत्या केली. नगीना बानो असे या महिलेचे नाव आहे. तर दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक लहान मुलगा जखमी झाला आहे.




























































