युद्ध नसतानाही जवान शहीद का होताहेत? सरसंघचालकांचा मोदी सरकारला खरमरीत सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mohan-bhagwat

सामना ऑनलाईन । नागपूर

हिंदूच्या पवित्र कुंभमेळ्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी राम मंदिरावरून मोदी सरकारला प्रश्न केले. तर आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी जवानांच्या शहीद होण्यावरून सरकारवर टीका केली आहे. देशात युद्ध सुरू नाही आणि तरी देखील सीमेवर जवान शहीद का होताहेत? असे विचारत त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. याचा अर्थ आपण आपले काम योग्यरितेन करत नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारला खडसावले आहे.

नागपूरमधील प्रहार समाज जागृति संस्थेच्या गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावले. इंग्रजांचे आपल्यावर राज्य सुरू होते त्यावेळात देशातील नागरिकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केले. त्यानंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर युद्धा दरम्यान शत्रूशी लढई झाली किंवा होते तेव्हा सैनिक प्राणांची बाजी लावतात आणि देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करतात, असे भागवत यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी थेट मोदी सरकारला लक्ष्य केले. सैनिक बलिदान करतात हे खरे आहे. पण देशात युद्ध सुरू नाही आणि तरी देखील जवान शहीद होताहेत याचा अर्थ आपण आपले काम योग्यरितेन करत नाही. पुढे ते म्हणाले की, युद्ध नाही तर सीमेवर जवानांचे प्राण जाण्याचे कारण नाही, पण आज जवान शहीद होतानाचे चित्र दिसत आहे.

एवढेच नाही तर त्यांनी सैनिकांच्या शहीद होण्यावर चिंता व्यक्त करतानाच त्यांनी हे थांबवण्यासाठी आणि देशाला महान बनवण्यासाठी योग्य पाऊले उचलण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

मोहन भागवत यांचे हे विधान अत्यंत महत्वपूर्ण मानले जात आहे. कारण जम्मू-कश्मिरातील दहशतवाद रोखण्याच्या मुद्यावर मोदी सरकारने अनेक दावे केले आहेत. विरोध यावर कायम टीका करत होते. मात्र आता खुद्द सरसंघचालकांनीच लक्ष्य केल्याने मोदींना घेरण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे.

महत्वाची बाब म्हणजे माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार मे 2014 ते मे 2017 या कालावधीत जम्मू-कश्मीरमध्ये 812 दहशतवादी कारवाया झाल्या. या घटनांमध्ये 62 नागरिकांना मृत्यू आला आणि 183 जवान शहीद झाले आहेत.