हिंदुंनीच मुस्लिमांचे संरक्षण केले; हमास-इस्रायल युद्धाबाबत मोहन भागवत यांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रायल- हमास युद्धाबाबत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. हिंदू हा एकमेव धर्म असा आहे, ज्यात हिंदू धर्म सर्व धर्माचा सन्मान करतो. तसेच या मुद्द्यावरून हिंदुस्थानात कधीही वाद किंवा लढाई झालेली नाही. आम्ही सर्व धर्मांचा सन्मान करतो, त्यामुळेच देशात या मुद्द्यावरून कधीही वाद झालेले नाहीत. मात्र, जगभरात अनेक ठिकाणी याच मुद्द्यावरून युद्धेही झाली आहेत. आता हमास-इस्रायल युद्धाही याचमुळे होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नागपूरातील एका शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

हिंदुस्थानात सर्व धर्म, संस्कृती, संप्रदाय आणि आस्थांचा सन्मान करण्यात येता. हा हिंदूचा देश आहे. याच अर्थ आम्ही इतर धर्म अमान्य करतो किंवा त्यांचा अनादर करतो, असा होत नाही. याआधी या देशात हिंदूंनीच मुस्लिमांचे संरक्षण केले आहे. फक्त हिंदूच असे करू शकतात. जगभरात हिंदुस्थान हा असा एकमेव देश आहे, ज्याने इतर धर्मियांना संरक्षण देत त्यांचा सन्मान केला आहे. इतर कोणत्याही देशात असे झालेले नाही.

जगभरात धर्माच्या नावाखाली संघर्ष आणि युद्धे होत आहेत. हमास आणि इस्रायल युद्धही याच कारणाने होत आहेत. मात्र, हिंदुस्थानात धर्मावरून कधीही युद्ध झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही परकीयांविरोधात युद्ध केले. त्यावेळी त्यांनी स्वराज्यातील मुस्लिमांचेही संरक्षण केले. इतर धर्मियांचा आदर करत त्यांना सन्मान देणे हे फक्त हिंदूच करू शकतात, असेही भागवत म्हणाले.