श्रद्धाच्या हत्येविरोधात आयोजित महापंचायतीच्या मंचावर हाणामारी, महिलेने एकाला चपलेने झोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रद्धा वालकर हत्याकांडांविरोधात दिल्लीत हिंदू एका मंचाकडून महापंचायत आयोजित करण्यात आली होती. या महापंचायतीच्या दरम्यान स्टेजवरच एका महिलेने तिथे उपस्थित पुरुषाला चपलेने मारायला सुरुवात केली. काही लोकांनी त्या महिलेला रोखायचा प्रयत्नही केला.

श्रद्धाला न्याय मिळावा म्हणून हिंदू एकता मंचाने तिची हत्या झाली त्याच परिसरात महापंचायत आयोजित केलेली. त्या महापंचायतीला बेटी बचाओ फाऊंडेशनने देखील पाठिंबा दिलेला. या महापंचायतीत अचानक एक महिला मंचावर आली व तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगू लागली. त्यावेळी मंचावर असलेला एक व्यकी तिला ढकलून माईकपासून दूर लोटत होता. ते महिलेला सहन झालं नाही. तिने पायातली चप्पल काढली व त्याला मारायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने अत्यंत थंड डोक्याने तिची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे केले. हे तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले. पुरावा मिटव्यासाठी रोज रात्री तो यातील एक तुकडा जंगलामध्ये फेकत होता. या हत्याकांडाचा सहा महिन्यांनी खुलासा झाला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या हत्या प्रकरणात नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताबने तीन करवतींच्या ब्लेडचा वापर केला होता. हत्येसाठी वापरलेले ब्लेड आणि करवत डीएलएफ गुरुग्राममध्ये आपल्या कार्यालयाजवळ फेकल्याचे आफताबने चौकशीत सांगितले आहे.