
सामना प्रतिनिधी । मुंबई
सरकारी असो, रहिवासी असो किंवा खासगी इमारत… पानांच्या पिचकाऱ्यांनी इमारतींचे कोपरे कायम लाल झालेले असतात… कितीही साफ केले तरी हे डाग काही जात नाहीत… मात्र हे डाग घालविण्यासाठी रुईया महाविद्यालयाने पाऊल उचलले आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संशोधन सुरू केले असून संशोधनाच्या पहिल्या टप्प्यातच अमेरिकेच्या जेनेटिकली इंजिनीअर्ड मशीन्स (आयजेम) स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे.
पानांचे डाग घालविण्याच्या संशोधनात सुवर्णपदक मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विद्यार्थी व शिक्षकांचा आज सत्कार केला. बोस्टन, अमेरिका येथे गेल्या आठवडय़ात झालेल्या इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनीअर्ड मशीन्स (आयजेम) या स्पर्धेत या चमूने या संशोधनासाठी सुवर्णपदक पटकाकले. या स्पर्धेसाठी पानाचे डाग घालवण्यावर संशोधन करण्याचा विषय निवडला. यासाठी आवश्यक त्या बाबी गोळा केल्यानंतर त्या तिथे सादर करण्यात आल्या. यामुळे ‘बेस्ट ह्युमन प्रॅक्टिसेस’ या विभागातील सुवर्णपदक मिळाल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुश्री लोकूर यांनी सांगितले. बेस्ट प्रोजेक्ट अंडर एनव्हारमेंट ट्रक आणि बेस्ट प्रेझेंटेशन या दोन वर्गवारीतसुद्धा या प्रकल्पाचे मानांकन झाले आहे. संपूर्णपणे विद्यार्थिनींचा समावेश असलेल्या या चमूत ऐश्वर्या राजूरकर, अंजली वैद्य, कोमल परब, निशिता पांगे, मैथिली सावंत, मिताली पाटील, सानिका आमरे आणि श्रृतिका सावंत यांचा समावेश आहे. या चमूला डॉ. अनुश्री लोकूर, डॉ. मयूरी रेगे, सचिन राजगोपालन आणि मुग्धा कुळकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
काय आहे संशोधन…
पानांचे डाग नष्ट करण्यासाठी सूक्ष्म जिवांचा वापर करण्यात येत आहे. हे सुक्ष्म जीव ज्या ठिकाणी पानांचे डाग असतील तेथील ठिकाणी प्रे केल्यास तेथील भाग रंगहीन होण्यास मदत होते. पानांचे डाग प्रभाकीपणे नष्ट करण्याचे हे आर्थिकदृष्टय़ासुद्धा परकडणारे तंत्रज्ञान आहे. सध्या हे संशोधन प्राथमिक स्तरावर आहे.



























































