खार सब वे कोसळला! पश्चिम रेल्वेला लागला अफवांचा सिग्नल!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

एकीकडे मुले चोरणाऱ्या टोळीच्या अफवेमुळे अवघा महाराष्ट्र बेजार झालेला असतानाच आज मुंबईत खार सब वे कोसळल्याची जोरदार अफवा पसरली आणि पश्चिम रेल्वे ठप्प झाली. अफवांचा हा सिग्नल एवढा लाल होता की पश्चिम रेल्वेच्या अभियंत्यांना खार सबवेत जावे लागले आणि सब वे सुरक्षित असल्याचे जाहीर करावे लागले.

संध्याकाळी पाचच्या सुमारास ही अफवा पसरली पण त्यामुळे पुढे तासभर पश्चिम रेल्वेच्या सर्व मार्गांवरील वाहतूक लटकली. हार्बर ५.४५ वाजता तर जलद मार्गावरील वाहतूक ५.५० आणि धीमा मार्ग ५.५२ ला सुरू झाला. अंधेरी पुलाचा भाग कोसळल्यानंतर पश्चिम रेल्वेचे अधिकारी आता ताकही फुंकून पिऊ लागले आहेत. म्हणूनच कदाचित अफवा कानी येताच त्यांनी तातडीने सबवेच्या दिशेने धाव घेतली.

काय घडले
खार रोड व सांताक्रुझ स्थानकादरम्यान वेलिंग्टन जिमखान्याजवळच्या सब वेमधील माती कोसळल्याची बोंब झाली.
सबवे बंद करण्यात आला. लोकल वाहतूकही थांबवली.

मालाडचाही पूल कोसळल्याची अफवा
पश्चिम रेल्वेवर रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असतानाच मेगाब्लॉकची भर पडली होती. या दुहेरी परिणामामुळे पश्चिम रेल्वेवरील सेवांचा वेग मंदावला होता. दुपारी ४.३० च्या सुमारास मेगाब्लॉक संपुष्टात आला आणि सेवा पूर्ववत येण्यास सुरुवात झाली. पण तेव्हाच सायंकाळी पाचच्या सुमारास खार सब वेतून माती घसरल्याचे वृत्त पसरले. त्यापाठोपाठ मालाडचा पूल कोसळल्याची अफवा पसरली.