आजचा अग्रलेख : फुटीरतावादी बांडगूळ

19

दहशतवादी आणि कश्मीरमधील फुटीरतावादी या दोघांचे लक्ष्यकश्मीरचा तुकडा पाकड्यांच्या घशात घालण्याचे आहे. त्यासाठी एकीकडे जिहाद्यांचा दहशतवाद तर दुसरीकडे गिलानीसारख्यांचा फुटीरतावाद पोसला जात आहे. या सगळय़ांना पाकिस्तानकडून कसा रग्गड पैसा दिला जातो हे सध्या तुरुंगात असलेल्या आसिया अंद्राबी या महिला नेत्यानेच कबूल केले आहे. सय्यद गिलानीसारख्या नेत्यांनादेखील म्हणूनच पाकप्रेमाचा पान्हा फुटत असावा. कश्मीरसारख्या नंदनवनात पोसली जात असलेली ही फुटीरतावादी बांडगुळे आहेत. त्यांची फक्त आर्थिक नाकेबंदी करून किंवा त्यांच्या नाड्या आवळून उपयोग नाही. त्यांची पूर्ण छाटणीच करायला हवी.

अल कायदा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अल जवाहिरी याने कश्मीरवरून हिंदुस्थानला धमकी दिली आहे; तर दुसरीकडे कश्मिरी फुटीरतावादी नेते सय्यद अली शहा गिलानी यांनी त्यांच्या पाकिस्तानप्रेमाची बांग दिली आहे. अल जवाहिरी याने कश्मीरमध्ये दहशतवाद भडकविणारा संदेश सोशल मीडियावर जारी केला आहे, तर सय्यद गिलानी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हे महाशय ‘आपण पाकिस्तानी आहोत आणि पाकिस्तान आपला आहे,’ असे गरळ ओकताना दिसतात. इस्लामी दहशतवादी संघटना आणि त्यांचे म्होरके काय किंवा त्यांच्यासाठी जम्मू-कश्मीरमध्ये वळवळ करणारे फुटीरतावादी काय, सगळे एकाच माळेचे मणी आहेत. अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटना या देशाच्या उघड उघड शत्रू आहेत. मात्र गिलानी, आसिया अंद्राबी, बिलाल लोन, मीरवाइज उमर फारुख आणि इतर फुटीरतावादी नेत्यांनाही वेळोवेळी पाकप्रेमाचा पान्हा फुटत असतो. गिलानी यांचा हा व्हिडीओ कश्मीरमधील कोणत्या भागाचा आणि कधीचा आहे याचा नेमका तपशील समोर आलेला नाही. मात्र त्यापेक्षा गिलानी यांनी सोडलेले

हिरवे फूत्कार

गंभीर आहेत. पाकिस्तानी राष्ट्रगीत गाऊन चर्चेत आलेली ‘दुख्तरान-ए-मिल्लत’ या संघटनेची फुटीरतावादी महिला नेता असिया अंद्राबी हिचे घर दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी ‘सील’ केले जाते. फुटीरतावादी नेते केंद्र सरकारशी चर्चा करण्यास तयार असल्याचे जम्मू-कश्मीरचे राज्यपाल सांगतात आणि त्याच वेळी गिलानी यांचा हा व्हिडीओ व्हायरल होतो. याचा अर्थ स्पष्ट आहे. जम्मू-कश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीची मुदत सहा महिन्यांनी वाढविण्यास संसदेने गेल्याच आठवड्यात मान्यता दिली. केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरमधील फुटीरतावादी कारवाया, त्या करणाऱ्या संघटना, त्यांचे नेते आणि तेथील पाकपुरस्कृत दहशतवाद याविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. तरीही गिलानीसारखा नेता पाकप्रेमाचे फूत्कार सोडतो. पाकिस्तानबद्दल एवढेच प्रेमाचे भरते आले असेल तर त्याने आपले येथील बूड हलवावे आणि पाकिस्तानात जाऊन राहावे. हिंदुस्थानी सरकारच्या सोयीसवलती, सुखसुविधांचा लाभ घ्यायचा आणि हिंदुस्थानद्रोहाच्या गोष्टी करायच्या. दुसरीकडे

कश्मीरचा लचका

तोडून पाकड्यांच्या घशात घालण्यासाठी कारस्थाने करायची. स्वतःच्या मुलामुलींना शिक्षण आणि नोकरीसाठी परदेशात ठेवायचे आणि कश्मिरी तरुण-तरुणींची माथी मात्र हिंदुस्थानद्वेषाने भडकवायची. आमच्या सैनिकांवर फेकण्यासाठी त्यांच्या हातात दगड द्यायचे. स्वतःच्या मुलांना घडवायचे आणि कश्मिरी तरुणांना बिघडवायचे! कश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांचे वर्षानुवर्षे हेच धंदे सुरू आहेत. इस्लामी दहशतवादी आणि कश्मीरमधील फुटीरतावादी या दोघांचे ‘लक्ष्य’ कश्मीरचा तुकडा पाकड्यांच्या घशात घालण्याचे आहे. त्यासाठी एकीकडे जिहाद्यांचा दहशतवाद तर दुसरीकडे गिलानीसारख्यांचा फुटीरतावाद पोसला जात आहे. या सगळय़ांना पाकिस्तानकडून कसा रग्गड पैसा दिला जातो हे सध्या तुरुंगात असलेल्या आसिया अंद्राबी या महिला नेत्यानेच कबूल केले आहे. सय्यद गिलानीसारख्या नेत्यांनादेखील म्हणूनच पाकप्रेमाचा पान्हा फुटत असावा. कश्मीरसारख्या नंदनवनात पोसली जात असलेली ही फुटीरतावादी बांडगुळे आहेत. त्यांची फक्त आर्थिक नाकेबंदी करून किंवा त्यांच्या नाड्या आवळून उपयोग नाही. त्यांची पूर्ण छाटणीच करायला हवी.