
सुरावटी निर्माण होतील, गाणे निर्माण होईल, पण नादमयी सुरांचा झंकार कायमचा संपला आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने गंगा-यमुना, गोदावरी, झेलमचा प्रवाहही थांबला आहे. हिमालयही दुःखाने वितळून गेला आहे आणि महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा कडा वेदनेने अस्वस्थ झाला आहे.
गान सरस्वती स्वगृही म्हणजेच स्वर्गलोकी परतली आहे. लता मंगेशकरांच्या स्वर्गारोहणाने पृथ्वी अश्रूंनी भिजली आहे. स्वरलतेचे रविवारी सकाळी लोकार्थाने निधन झाले, परंतु आमचेच काय, सारे जग ती बातमी स्वीकारायला तयार नाही. लता मंगेशकर यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल केले, तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे व त्या लवकरच प्रभुकुंजवर परत येतील, असा विश्वास होता. देशभरात त्यांच्यासाठी प्रार्थना सुरू होत्या, पण लता इस्पितळातून थेट प्रभूघरी निघून गेल्या. प्रभुकुंज तर सुने झालेच, पण अखंड 70 वर्षे सुरू असलेली देशातील संगीत मैफलही सुनी सुनी झाली आहे. लतादीदींच्या जाण्याने संगीत युगाचा एकापरीने पूर्णास्त झाला आहे. सुरावटी निर्माण होतील, गाणे निर्माण होईल, पण नादमयी सुरांचा झंकार कायमचा संपला आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने गंगा-यमुना, गोदावरी, झेलमचा प्रवाहही थांबला आहे. हिमालयही दुःखाने वितळून गेला आहे आणि महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा कडा वेदनेने अस्वस्थ झाला आहे. लतादीदींचे वय 92 वर्षे होते. त्या परिपूर्ण जीवन जगल्या. त्या वृद्धापकाळाने स्वर्गस्थ झाल्या असे कसे म्हणायचे? त्यांचा स्वर, त्यांचे मन, त्यांचे वावरणे, संवाद शेवटच्या श्वासापर्यंत तरुणच होता. गेली 75 वर्षे लता मंगेशकर नावाचा चमत्कार आपल्या जीवनाचा भाग बनला होता, हे किती मोठे भाग्य! मास्टर दीनानाथ यांची ही ज्येष्ठ कन्या 28 सप्टेंबर 1929 रोजी जन्माला आली, तेव्हा दीनानाथांचा मुक्काम इंदूरमध्ये होता. दीनानाथ मंगेशकरांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा लतादीदी अवघ्या तेरा वर्षांच्या होत्या. मास्टर विनायक यांनी मंगेशकर भावंडांची काळजी घेतली. लतास गायिका आणि अभिनेत्री म्हणून पुढे आणले. 1942 साली ‘किती हसाल’ या चित्रपटासाठी लतादीदी पहिल्यांदा गायल्या तेव्हापासून त्यांच्या सुरांची बरसात अखंड सुरूच राहिली. संगीतकार गुलाम हैदर यांचा तेव्हा दबदबा होता. त्यांच्याकडे गाण्याची संधी मिळणे म्हणजे गायकाच्या दृष्टीने त्या काळचा सर्वोच्च सन्मान होता. रेकॉर्डिंगचे तंत्र तेव्हा आजच्याइतके प्रगत नव्हते. खय्याम सांगतात, ‘मजबूर’ सिनेमातील ‘पिया मिलने को आ’ या गाण्याच्या वेळी एक मुलगी अगदी सहज गाताना दिसत होती. तिचा आवाज हृदयाच्या तळाचा ठाव घेणारा होता.’ रेकॉर्डिंग संपल्यावर खय्याम यांनी प्रश्न विचारला, ‘मघाशी गाणारी ती मुलगी कोण होती?’ हैदर साहेबांनी तिचे नाव सांगितले, ‘लता मंगेशकर.’ हैदर यांनी त्याच वेळी भविष्यवाणी उच्चारली. ते म्हणाले, ‘अगर उसका दिमाग बॅलन्स रहा तो वो आसमाँ छू जायेगी.’ मास्टरजींची भविष्यवाणी खरी ठरली. मास्टरजींनी लता मंगेशकर यांना सांगितले, ‘‘बेटा, गाना शुरू करो.’’
लतादीदींनी गाणे सुरू केले. लतादीदी लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर पोहोचल्या. हे शिखर गेल्या दहा हजार वर्षांत कुणालाच गाठता आले नाही. लताचे गाणे हे साऱ्या आसमंताचे जगणे झाले. मास्टर दीनानाथांच्या समृद्ध संगीताचा वारसा लतादीदींना लाभला. लतादीदी म्हणतात, ‘‘मी जेव्हा आठ वर्षांची होते तेव्हा माझ्या वडिलांनी, जे माझे गुरू पण होते, मला बजावलं होतं की, ‘आपण करतोय ते बरोबर आहे, सत्य आहे अशी एकदा तुझी खात्री झाली की बस्स… मग कोणालाही घाबरू नकोस. घाबरायचं झालं तर स्वतःलाच!’ आजपर्यंत मी याच मंत्राचं पालन करीत आले आहे.’’ लता मंगेशकर यांना ईश्वरी वरदानच होते. एकदा अंगणात खेळत असलेल्या लतादीदींनी चुकीच्या पद्धतीने गात असलेल्या दीनानाथांच्या विद्यार्थ्यांस आत जाऊन ‘पुरिया धनश्री’ गाऊन दाखवण्यास सुरुवात केली. दीनानाथांनी ते ऐकताच दुसऱ्या दिवसापासून लतादीदींची संगीत शिकवणी सुरू केली. त्यानंतर 70-75 वर्षे लता मंगेशकर हा अमृतमय स्वरांचा एक निरंतर प्रवाह बनून जगभरात वाहत राहिला. लता मंगेशकरांच्या आवाजाने हिंदुस्थानी चित्रपटसृष्टी जवळजवळ अर्धे शतक गातच आहे. मराठी आणि हिंदीतल्या किती गाण्यांची यादी द्यावी, ज्या गाण्यांनी आमचे जीवन समृद्ध केले. शंकर-जयकिशन यांनी जवळजवळ सर्वच चित्रपटांसाठी लतादीदींचाच आवाज घेतला. ‘आग’ला राम गांगुली संगीतकार होते. ‘आह’, ‘श्री 420’, ‘चोरी चोरी’तील लतांच्या गाण्यांनी तर बहार केली. सचिनदेव बर्मन, नौशाद, राहुलदेव बर्मन, खय्यामपासून जयदेवपर्यंत सगळय़ाच संगीतकारांनी लतांच्या सुरांना संगीताचे कोंदण दिले. 1960 मध्ये ‘प्यार किया तो डरना क्या’ हे ‘मुगल-ए-आजम’चे नौशादने संगीतबद्ध केलेले आणि मधुबालावर चित्रित केलेले गाणे तुफान लोकप्रिय झाले. ‘अजिब दास्तां है ये’ हे शंकर-जयकिशनचे संगीत असो नाही तर सचिनदेव बर्मनने संगीतबद्ध केलेले ‘आज फिर जिने की तमन्ना है’, ‘पिया तोसे नैना लागे रे’, ‘गाता रहे मेरा दिल’, ‘होठों पे ऐसी बात’सारखी बर्मनदांची असंख्य गाणी लताच्या सुरांनी अजरामर केली. मदन मोहन हे लतादीदींचे आवडते संगीतकार. 1960 च्या दशकात लता मंगेशकरांनी मदन मोहनसाठी
अनेक गाणी
म्हटली. त्यात ‘अनपढ़’ (1962) चे ‘आप की नजरोंने समझा’, ‘वो कौन थी’ (1964) ची ‘लग जा गले’, ‘मेरा साया’ (1966) चे ‘तू जहां जहां चलेगा’ या गाण्यांचा उल्लेख करावा लागेल. 1960 च्या दशकात लक्ष्मीकांत-प्यारेलाल या नव्या संगीतकार जोडीचा उदय झाला. त्यांची गाणी लता मंगेशकरांनी लोकप्रिय केली. सलील चौधरी, हेमंतकुमार यांच्यासाठी लता गात राहिल्या. 1961 मध्ये लतादीदींनी जयदेव यांच्यासाठी ‘अल्ला तेरो नाम’ हे भजन गायले. 27 जून 1963 ला हिंदुस्थान-चीन युद्धानंतर दिल्लीतील कार्यक्रमात कवी प्रदीप यांच्या लेखणीतून उतरलेले, सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेले ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गीत गायले, तेव्हा पंडित नेहरूंच्याच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या डोळय़ांतून अश्रू पाझरले. हिंदी-मराठीच नाही, तर देशातील सर्वच भाषांतून हजारो गीते लतादीदींनी गायली. गाणे ही संगीताची साधना आहे. ती सरस्वतीची पूजा आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यामुळे जगात कोठेही गाताना लतादीदींनी पायांत चपला घातल्या नाहीत. संगीताशिवाय आम्ही आयुष्यात दुसरे काहीही करणार नाही, अशी शपथ सर्व मंगेशकर भावंडांनी दीनानाथांच्या निधनानंतर घेतली व त्या प्रतिज्ञेचे निष्ठsने पालन केले. ‘तो कोपऱ्यातला माझा तंबोरा, ही उशाशी ठेवलेली चीजांची वही आणि श्री मंगेशाची कृपा याशिवाय तुला देण्यासारखं मजजवळ दुसरं काही नाही,’ असे मास्टर दीनानाथांनी या जगाचा निरोप घेताना लतादीदींना सांगितले होते. वडिलांनी दिलेला हा वसा लतादीदींनी मोठय़ा श्रद्धेने आयुष्यभर सांभाळला. त्या चीजांचे त्यांनी सोने केले. शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा असलेल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील लोकप्रिय चीजा चित्रपट संगीतासाठी वापरल्या गेल्या. त्या सर्व चीजा पुन्हा लता मंगेशकर यांच्या गळय़ातून उतरताच लोकप्रिय झाल्या. ताना, फिरकी, हरकती, उंच पट्टी हे सर्व त्यांच्या गळय़ात होतेच. अनवट चाली देण्यासाठी प्रसिद्ध असलेले संगीतकार सज्जाद हुसैन एकदा म्हणाले होते, ‘ये लडकी कभी गलत होती ही नहीं. कितनी भी मुश्कील तर्ज यह लडकी आसानीसे गाती है।’ अवघड रचना दीदींच्या गळय़ाने सोप्या केल्या. अनेक संगीतकारांनी हा चमत्कार अनुभवला. ‘माझ्या संगीत रचनांना लतादीदींचा आवाज लाभला आणि लोकप्रियता वाढू लागली. ‘कभी कभी’ हा चित्रपट हे याचे उत्तम उदाहरण आहे’, असे मोकळेपणाने सांगणारे खय्याम.
संगीत क्षेत्रातील नामवंत
आणि अग्रेसर असलेली एच.एम.व्ही. ही कंपनी एकेकाळी आर्थिक मंदीमुळे डबघाईस आलेली होती, पण लता मंगेशकर या नावामुळे आणि तिच्या स्वरांनी ती सावरली आणि व्यवसायात पुन्हा जोमाने उभी राहिली. लता मंगेशकर ‘स्वरलता’, ‘स्वरकोकिळा’, ‘गानसम्राज्ञी’ अशा विविध उपाध्यांनी लोकप्रिय होत्या. त्या ‘भारतरत्न’ झाल्या, पण त्यांचे नाते सुरांशी आणि लोकांच्या मनांशी, तारांशीच राहिले. त्यांच्या सुरांनी जनमनातील तारा झंकारत राहिल्या. लता मंगेशकरांनी हजारो मराठी गाणी गायली, पण ‘मोगरा फुलला’चा दरवळ कायम आहे. पी. सावळाराम, ग.दि.मा., जगदीश खेबूडकर हे गीतकार आणि वसंत प्रभू, वसंत देसाई, राम कदमांपासून अनेक संगीतकारांचे संगीत आणि लतादीदींचे स्वर मराठी संगीत समृद्ध करून गेले. ‘गंगा यमुना डोळय़ात उभ्या का’, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’, ‘शिव कल्याण राजा’, ‘म्यानातून उसळे’ अशा शेकडो गीतांना लतादीदींच्या स्वरांचा साज चढला. ‘आनंदघन’ या उपनावाने लतादीदींनी मराठी चित्रपटांना संगीत दिले. जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी सूर्य, चंद्र आणि लताचा सूर हा युगानुयुगे कायमच राहणार आहे. त्यास पर्याय नाही. लतादीदींच्या जाण्याने एक कालखंड संपला. संगीत यात्रा संपली, पण त्यांचे स्वर अमर आहेत. कलावंताचे जीवन हे भरसमुद्रात सतत प्रवास करणाऱ्या प्रचंड जहाजासारखे असते. त्याने अनेक खडक ओलांडायचे असतात. भरधाव अंगावर येणाऱ्या लाटांना चुकवायचे असते आणि ते सारे करताना शरीराची आणि मनाची दोन्हींची किंमत दिलेली असते. लता मंगेशकर यांचे जीवनही त्याच पद्धतीचे होते. ‘आज तुम्ही ज्या मुलीचा आवाज पसंत नाही, असं सांगत आहात त्या मुलीच्या दारात थोडय़ाच वर्षांत चित्रपट निर्माते रांग लावून उभे आहेत, असे दृश्य तुम्हाला पाहावयास मिळेल’, फिल्मीस्तानच्या शशीधर मुखर्जींनी लताचा आवाज नाकारल्यावर चिडलेल्या गुलाम हैदर यांनी हे सत्य त्यांना ऐकवले, ती भविष्यवाणीच होती. लता मंगेशकर या हिंदुस्थानी सिनेसृष्टीच्या त्या अर्थाने ‘गानसम्राज्ञी’च ठरल्या. लतादीदी आज इंद्राच्या दरबारी विशेष सिंहासनावर रुजू होण्यासाठी गेल्या, पण या भूतलावरील त्यांचे सूर-स्वरांचे सम्राज्ञीपद कायम राहील. सूर्य-चंद्र असेपर्यंत ते राहील. सूर्य मावळू द्या, चंद्र अस्ताला जाऊ द्या, पण लतादीदींचे सूर कायमच राहतील. त्यांच्या जीवनाचा प्रवास आज संपला, पण गाण्याचा, सुरांचा प्रवास कसा संपेल? गंगा-यमुनेप्रमाणे तो वाहतच राहील.





























































