आजचा अग्रलेख : रामाचे काम होईल!

43

अयोध्या आता तेजाने उजळून निघाली आहे. शरयूचे पात्रही उसळी मारून मोदी यांना आशीर्वाद देत आहे. त्या शरयूने असंख्य रामभक्तांचे हौतात्म्य पाहिले आहे. उत्तर प्रदेशात योगींचे राज्य आल्यापासून अयोध्येत झगमगाट आणि दिवाळी साजरी होते. “काँग्रेस राज्यात राम अंधारात होते. अयोध्येत दिवाळी साजरी करण्यापासून तुम्हाला कोणी रोखले होते?’’ असा कडक सवाल पंतप्रधान मोदी यांनी काशीला जाऊन विचारला. प्रश्न खरा आहे. अयोध्येत आता दिवाळीच होईल. रामाचे काम अयोध्येत आणि देशात सर्वत्र होईल. हाच जनादेश आहे.

प्रभू रामचंद्राचे काम करायचे आहे आणि रामरायाचे काम होणारच असे वचन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिले आहे. देशाच्या सत्तेवर रामाच्या विचाराचे सरकार आले आहे. देशात रामराज्य निर्माण व्हावे यासाठी कोटय़वधी जनतेने मोदी यांना भरभरून मते दिली ही सर्व प्रभू श्रीरामाचीच कृपा. अयोध्येत राममंदिर व्हावे व त्यासाठी प्रयत्न करावेत हा काही अपराध नाही. राम ही देशाची ओळख आणि अस्मिता आहे. अयोध्येत राममंदिर निर्माण व्हावे यासाठी शेकडो करसेवकांनी बलिदान दिले आहे. त्यांचे हौतात्म्य आणि रक्त वाया जाऊ देणार नाही अशा विचाराचे सरकार लोकांनी निवडून दिल्यावर रामाचे काम होणारच. सरसंघचालकांनी तेच सांगितले. उद्या मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ दुसऱयांदा घेत आहेत. अयोध्येत प्रभू श्रीरामाचा राज्याभिषेक झाला व सर्वत्र आनंदी आनंद पसरला तसेच वातावरण संपूर्ण देशात नव्या सरकारच्या निवडीनंतर निर्माण झाले. मोदी हे दोन दिवसांपूर्वी वाराणसी नगरीत गेले व म्हणाले, देशाला पुन्हा गतवैभव मिळवून देऊ. शेवटी हे गतवैभव म्हणजे काय, तर सगळा जनप्रवाह एकदिलाने, सुखाने नांदेल, श्रमणाऱयांना त्यांचा हक्क मिळेल, रिकाम्या हातांना काम मिळेल. घराघरांतून

सोन्याचा धूर

निघायलाच पाहिजे असा आग्रह कोणी धरणार नाही. मात्र निदान शेतकरी आत्महत्या करणार नाही, घरातल्या चुली दोन वेळा पेटतील, लोक सर्व धर्मांचे सणवार कर्ज न काढता साजरे करतील, मुख्य म्हणजे जाती-धर्माच्या भिंती तुटून पडतील, अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार होईल आणि जगभरात रामाच्या देशाचा जयजयकार होईल! यालाच आम्ही रामराज्य म्हणतो. मोदी यांनी अशा रामराज्यासाठी कटिबद्धता व्यक्त केली व हेच रामाचे काम आहे. रामाचे काम करण्यापासून आता त्यांना कोण रोखणार? ज्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला ते रावण, बिभीषण, कंसमामा वगैरे मंडळींना जनतेने घरी बसवले. त्यामुळे रामाचा विजयरथ आता कोणी रोखू शकणार नाही. उत्तम देश घडविणे हे एक प्रकारे राममंदिर निर्माण करण्यासारखे आहे, पण अयोध्येतही भव्य राममंदिर व्हावे हा संकल्प शिवसेना, भाजपसह करोडो हिंदू बांधवांनी सोडला आहे. निवडणुकीआधी श्री. मोदी यांनी स्पष्ट केले होते की, अयोध्येत राममंदिराची पायाभरणी होईलच, पण कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या संमतीने होईल. आम्ही त्यांच्या भूमिकेशी सहमत आहोत, पण सर्वोच्च न्यायालयानेदेखील पुरावे चिवडीत न बसता लोकभावना किंवा जनादेश मानायला हवा. रामाचे जन्मस्थान

कायद्याच्या किचकट व्याख्येत

अडकून पडू नये. कारण ही संपूर्ण भूमीच रामाची आहे. 2019 चा लोकसभा निवडणुकीचा निकाल हा रामराज्य आणि राममंदिराच्याच बाजूने दिलेला कौल आहे. उत्तर प्रदेशात भाजपने 61 जागांवर विजय मिळवला हा प्रभू श्रीरामाचाच आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपला मोठे यश मिळाले हा रामाचा आशीर्वाद आहे. आम्ही स्वतः अयोध्या वारी करून रामदर्शन घेतले व लवकरच सर्व विजयी खासदारांसह अयोध्येत जाणारच आहोत. राम आहे म्हणून देश व धर्म आहे. प. बंगालात ममता बॅनर्जी यांनी श्रीरामाचे नाव घेणाऱयांवर हल्ले केले तरीही अमित शहा श्रीरामाचा जयजयकार करीत राहिले व बंगालात भाजपास विजय मिळाला. हा आनंदाचा उत्सव आहे. अयोध्या आता तेजाने उजळून निघाली आहे. शरयूचे पात्रही उसळी मारून मोदी यांना आशीर्वाद देत आहे. त्या शरयूने असंख्य रामभक्तांचे हौतात्म्य पाहिले आहे. उत्तर प्रदेशात योगींचे राज्य आल्यापासून अयोध्येत झगमगाट आणि दिवाळी साजरी होते. “काँग्रेस राज्यात राम अंधारात होते. अयोध्येत दिवाळी साजरी करण्यापासून तुम्हाला कोणी रोखले होते?’’ असा कडक सवाल पंतप्रधान मोदी यांनी काशीला जाऊन विचारला. प्रश्न खरा आहे. अयोध्येत आता दिवाळीच होईल. रामाचे काम अयोध्येत आणि देशात सर्वत्र होईल. हाच जनादेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या