सामना अग्रलेख – शेवटचा खांब

महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार उत्तम चालले आहे व सरकार पाच वर्षे धावत राहील, अशी स्थिती आहे. भविष्यात देशाच्या राजकारणात उलथापालथ घडविणारी आघाडी निर्माण होईल काय? याची चाचपणी सुरूच असते. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेपाठोपाठ अकाली दलही बाहेर पडल्याने राष्ट्रीय राजकारण बेचव झाले आहे. काँग्रेस हा आजही मोठा पक्ष आहे. पण राष्ट्रीय पातळीवर निवडणुका जिंकल्याशिवाय राजकीय मोठेपण सिद्ध होत नाही. ज्या कारणांसाठी ‘एनडीए’ स्थापन झाली ते कारणच मोदींच्या झंझावातात नष्ट झाले हे सत्य स्वीकारून नवा झेंडा फडकवावा लागेल. सध्या तरी अकाली दल हा ‘एनडीए’चा शेवटचा ‘खांब’ही कलथून गेला आहे. राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वाचे राजकारणही त्यामुळे निस्तेज होताना दिसत आहे. नवा सूर्य उगवेल काय?  

पंजाबच्या अकाली दलानेही एनडीए म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा त्याग केला आहे. भाजपशी त्यांचीही प्रदीर्घ साथसंगत होती, पण ती आता सुटली आहे. अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल यांच्या सूनबाईंनी शेतकऱ्य़ाच्या प्रश्नांवर केंद्रीय मंत्रिमंडळातून आधीच राजीनामा दिला. तेव्हा बरे झाले राजीनामा दिला, सुंठीवाचून खोकला गेला याच आविर्भावात अकाली दल मंत्र्यांचा राजीनामा तडक स्वीकारण्यात आला. अकाली दलाचे मन वळवले जाईल, अशी टोकाची भूमिका घेऊ नका, असे त्यांना सांगितले जाईल. पण तसे काहीच घडले नाही. आता तर बादल हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले तरी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न होऊ नये, याचे आश्चर्य वाटते. शेतकऱ्य़ाच्या प्रश्नांवर केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी केला आहे. केंद्र सरकारने कृषी विधेयक जोरजबरदस्तीने मंजूर करून घेतले. आम्ही सरकारचा भाग असतानाही आम्हाला विश्वासात घेतले नाही, असे सुखबीरसिंग बादल यांचे सांगणे आहे. अखेर अकाली दलास राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडावे लागले व आणखी एक जुना, सच्चा साथीदार सोडून गेल्याबद्दल भाजपने अश्रूंची दोन टिपंही गाळली नाहीत. आधी शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडावे लागले. आता अकाली दल बाहेर पडले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे दोन प्रमुख स्तंभच बाहेर पडल्याने आता या आघाडीचे म्हणजेच एनडीएचे अस्तित्व खरोखर उरले आहे काय? हा प्रश्न आहेच. आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नक्की कोण कोण आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. जे आहेत त्यांचा हिंदुत्वाशी नक्की किती संबंध आहे? पंजाब आणि महाराष्ट्र ही दोन

मर्दानी बाण्याची राज्ये

आहेत. अकाली दल व शिवसेना हे त्या मर्दानगीचे चेहरे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणण्यापेक्षा भाजपप्रणीत आघाडी हाच उल्लेख करावा लागेल. 1995-96च्या दरम्यान काँग्रेस विरोधात एक मजबूत आघाडी राष्ट्रीय स्तरावर असावी, या भूमिकेतून एनडीए स्थापन झाले. तेव्हा राष्ट्रीय क्षितिजावर काँग्रेसचा सूर्य इतक्या तेजाने तळपत होता की, त्याचे चटके विखुरलेल्या विरोधकांना बसत होते. हिंदुत्व आणि नवराष्ट्रवादाचे वारे वाहत होतेच. बाबरीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्य़ातून धुराचे लोट निघत होतेच. त्यामुळे देशातील राजकीय माहोल गरम होता. वेगवेगळय़ा राज्यांतील वेगवेगळे पक्ष हे काँग्रेस विरोधात, त्यांच्या धोरणांविरोधात बोलत होते. मात्र मुद्दा एक, पण ‘सूर’ शंभर यामुळे फक्त कोलाहल आणि कलकलाटच माजला होता. जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखे प्रखर नेते काँग्रेसविरोधी धार पाजळत होते. तेव्हा आजचे नितीशबाबू ‘ज्युनियर’ होते. शिखांच्या दिल्लीतील हत्याकांडानंतर अकाली दलाचा काँग्रेसविरोधी प्रचार शिगेला पोहोचला होता. पण प्रत्येक जण आपापल्या काठीने साप समजून जमीनच धोपटत होता व त्यातूनच सत्ताधारी काँग्रेसचे फावले होते. महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची जहाल गर्जना करून देशात स्फुल्लिंग चेतवले होते. महाराष्ट्रात प्रखर हिंदुत्वाची जाग शिवसेनेमुळे आधीच होती व भाजपास त्यांची व्होटबँक शिवसेना काबीज करीत आहे, ही भीती वाटू लागली. त्यातूनच मतविभागणी टाळण्यासाठी आधी महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर युती झाली व पुढे काँग्रेस विरोधात ‘एनडीए’ म्हणून एक मजबूत आघाडी निर्माण झाली. या आघाडीत

अनेक चढउतार

आले. सत्ता आली, सत्ता गेली. अनेक घटक पक्ष सोयीनुसार सोडून गेले, पण एनडीएचे दोन खांब भाजपबरोबर राहिले ते म्हणजे शिवसेना व अकाली दल. आज या दोन्ही पक्षांनी ‘एनडीए’ला राम राम ठोकल्याने एनडीएत खरंच राम उरला आहे काय? पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दोन सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. अनेक राज्यांत त्यांची सत्ता आहे. जेथे अल्पमत होते, तेथेही या ना त्या मार्गाने सत्ता मिळविली. केंद्रीय सत्तेचे बाहुबल हाती असले की, काहीच अशक्य नसते, पण सत्तेचे ‘गड’ जिंकले तरी एनडीएतील दोन सिंह मात्र गमावले आहेत, हे वास्तव कसे नाकारणार? आज देशाचे राजकारण एकपक्षीय राजवटीच्या दिशेने ढकलले जात आहे. तरीही अनेक राज्यांत भाजपास आघाडय़ा करूनच निवडणुकांना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार उत्तम चालले आहे व सरकार पाच वर्षे धावत राहील, अशी स्थिती आहे. भविष्यात देशाच्या राजकारणात उलथापालथ घडविणारी आघाडी निर्माण होईल काय? याची चाचपणी सुरूच असते. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेपाठोपाठ अकाली दलही बाहेर पडल्याने राष्ट्रीय राजकारण बेचव झाले आहे. काँग्रेस हा आजही मोठा पक्ष आहे. पण राष्ट्रीय पातळीवर निवडणुका जिंकल्याशिवाय राजकीय मोठेपण सिद्ध होत नाही. ज्या कारणांसाठी ‘एनडीए’ स्थापन झाली ते कारणच मोदींच्या झंझावातात नष्ट झाले हे सत्य स्वीकारून नवा झेंडा फडकवावा लागेल. सध्या तरी अकाली दल हा ‘एनडीए’चा शेवटचा ‘खांब’ही कलथून गेला आहे. राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वाचे राजकारणही त्यामुळे निस्तेज होताना दिसत आहे. नवा सूर्य उगवेल काय?

आपली प्रतिक्रिया द्या