परीक्षण – मुलांसाठी वाचनीय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अरुण पुराणिक

प्रा. चंद्रसेन टिळेकर हे दीर्घकाळ मराठी साहित्याच्या प्रांतात विविध विषयांवर लेखन करीत आलेले आहेत. ललित, वैचारिक, वैज्ञानिक अशा साहित्याच्या सर्व दालनात त्यांनी लिखाण केले आहे. असे असले तरी आतापर्यंतची प्रसिद्ध झालेली त्यांची 25 पुस्तके ही प्राधान्याने प्रौढ वाचकांसाठीच आहेत. गेल्या काही वर्षांपासून मात्र ते बालसाहित्याकडे वळलेले दिसतात आणि तसे त्यांचे काही बालकथा व बाल कवितासंग्रहही प्रसिद्ध झालेले आहेत. साहित्यातील आपल्या मार्गबदलाबद्दल ते स्वतःच एके ठिकाणी म्हणतात की, मी इतकी वर्षे प्रबोधनाच्या चळवळीत काम केले, पण त्यामानाने यश हे खूपच मर्यादित स्वरूपात मिळाले. कारण समाजात काही वैचारिक परिवर्तन घडवायचे असेल तर तशी रुजवात उमलत्या पिढीत करणेच फलदायी असते. वयाने वाढलेल्या मंडळींचे विचार पक्के झालेले असतात आणि ते सहसा आपले विचार बदलत नाहीत. लेखकाचे हे म्हणणे पटण्यासारखे आहे. नुकतीच प्रा. चंद्रसेन टिळेकर यांची मुलांसाठी दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ‘मुलांनो, गाडा या अंधश्रद्धा’ हे गद्य स्वरूपात आहे, तर ‘विज्ञानोबा, तू माझा सांगाती’ हा किशोरवयीन गटासाठी लिहिलेला कवितासंग्रह आहे.

मुलांनो, गाडा या अंधश्रद्धा!

‘सनय प्रकाशना’ने प्रसिद्ध केलेले हे पुस्तक या आधीच्या तीन आवृत्यांपेक्षा खूप देखणे व बहारदार झालेले आहे. या पुस्तकाचे वैशिष्टय़ हे आहे की, लेखकाने अंधश्रद्धा या मूळ विषयाला हात घालण्यापूर्वी पृथ्वीची उत्पत्ती, सजीवांची निर्मिती हे महत्त्वाचे विषय अत्यंत सोपे करून सांगितले आहेत. हे विश्व कुठल्या मानवी, अमानवी अथवा दैवीशक्तीने निर्माण केलेले नाही, तर कोटय़वधी वर्षांपूर्वी निसर्गात जो महास्फोट झाला त्याची परिणिती म्हणून हे जग अस्तित्वात आले, हे मुलांच्या मनावर ठसविण्याचा सक्षम प्रयत्न केला आहे.

समाजातील ठळक अंधश्रद्धा म्हणजे भुताचे अस्तित्व, अंगात येणे, चमत्काराची विश्वासार्हता, ग्रहांचे कथित परिणाम, दुष्टशक्ती आणि त्यायोगे केलेली ‘करणी’ या सर्व गैरसमजुतींना शास्त्रिय नियमांच्या आधारे हास्यास्पद केले आहे. शास्त्र्ााrय नियम लावून अंधश्रद्धा ओळखता तर येतातच, पण तर्कबुद्धी वापरूनही अंधश्रद्धा कशा ओळखता येतात तेही लेखकाने स्पष्ट केले आहे. मुलांना हे पुस्तक वाचताना लेखक आपल्याशी गप्पा मारताहेत असाच भास होईल. कारण लेखकाने प्रयत्नपूर्वक गमतीदार गप्पिष्ट अशी शैली वापरली आहे.

या पुस्तकाला प्रसिद्ध विज्ञान लेखक प्रा. मोहन आपटे यांची प्रस्तावना लाभली आहे. शिक्षण खात्याने या पुस्तकाची पुरवणी वाचन म्हणून शाळांना शिफारस करावी, असेही ते सुचवितात.

विज्ञानोबा, तू माझा सांगाती

या पुस्तकाच्या शीर्षकावरूनच हे पुस्तक विज्ञानाची महती सांगणारे असावे असे वाटते आणि तसे ते आहेही, परंतु त्या व्यतिरिक्तही लेखकाने/कवीने काही वेगळे विषय आपल्या कवितांसाठी घेतले आहेत. उदा. धावपटू कविता, चिपको आंदोलन, तसेच जोतिबा, शाहूराजेंसारखे समाजसुधारक इत्यादी. किशोरवयीन मुलांचा गट समोर ठेवून या कविता लिहिलेल्या दिसतात. या पुस्तकातील काही विषय तर खरेच अनोखे असे म्हणावे लागतील. उदाहरणार्थ, कृत्रिम पाऊस, आधुनिक जाते (मिक्सर), जळीस्थळी सर्वत्र दिसणारी विविध आकाराची मोटर, सखा मोबाईल इत्यादी. ‘असे हे शास्त्र्ाज्ञ’ या कवितेत ग्रॅहम बेल, न्यूटन, मादाम क्युरी, एडिसन, गॅलिलिओ, ल्युई पाश्चर, डार्विन या वैज्ञानिकांचा त्यांच्या शोधासह गौरव करण्यात आला आहे.

श्री. चंद्रसेन टिळेकर हे अनेक विवेकवादी चळवळीशीही जोडले गेले असल्याने ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ हा विषयही त्यांच्या कवितेत येणे स्वाभाविकच होते. ‘पोपटपंची’, ‘अपशकुनी’, ‘युग ज्ञानप्रकाशाचे’, ‘नागोबाचे दुःख’ इत्यादी कविता याची साक्ष देतात.

‘विज्ञानोबा तू माझा सांगाती’ या कवितेत विज्ञानाने आपले जीवन किती सुकर केले आहे, हे कृतज्ञतापूर्वक आपल्या सर्वांसमोर मांडले आहे. ‘सातासमुद्रापार’ या कवितेत कवीला पाश्चिमात्य देशात जायचे आहे, पण ते केवळ ते देश पाहण्यासाठी, नव्हे तर त्या-त्या देशातील शास्त्र्ाज्ञांच्या प्रयोगशाळा पाहण्यासाठी. इंद्रधनुष्यातील सात रंगाचे आपापल्या रंगाच्या श्रेष्ठत्वासाठी रंगलेले भांडण, ‘ळ ची वळवळ’ या कवितेत ‘ळ’ अक्षराने सांगितलेले स्वतःचे महत्त्व, तसेच आई जेव्हा ऑफिसला दांडी मारते तेव्हा आपण खूश होतो, पण आपण जेव्हा शाळेला दांडी मारतो तेव्हा आई का बरे चिडते, असा निरागस प्रश्न मुलगा आपल्या आईला ‘दांडी’ या कवितेत विचारतो. अशा रीतीने या कवितासंग्रहातील सर्वच्या सर्व म्हणजे तीस कविता रंजकदार झाल्या आहेत.

या बहारदार संग्रहाला प्रसिद्ध बालसाहित्यकार श्री. एकनाथ आव्हाड यांनी प्रस्तावना लाभली आहे. ते लिहितात, श्री. टिळेकरांचा हा किशोर कवितासंग्रह  ‘राजहंस’ या कवितेसारखाच देखणा झाला आहे.

‘मुलांनो, गाडा या अंधश्रद्धा’

प्रकाशक: सनय प्रकाशन

पृष्ठ: 72, मूल्य: रुपये 100/-

 

‘विज्ञानोबा, तू माझा सांगाती’

प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन

पृष्ठ: 40, मूल्य: रुपये 130/-