टेनिस कोर्टवर क्रिकेट शॉट : सचिन फेडररवर बेहद्द खुश

38

सामना ऑनलाईन | लंडन

टेनिसचा सुपरस्टार रॉजर फेडरर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची घनिष्ट मैत्री सर्वानाच चांगलीच माहित आहे. रॉजर जिंकला कि सचिनचे अभिनंदनाचे ट्विट त्याला सर्वांआधी येते आणि सचिनने एखादा पराक्रम साकारला की फेडररचा अभिनंदन करणारा मेसेज सचिनला यायलाच हवा. ही मालिका गेली अनेक वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. यंदाच्या विम्बल्डनप्रसंगीही त्याचा प्रत्यय क्रीडाशौकिनांना आला. सोमवारी स्वित्झर्लंडच्या फेडररने फ्रान्सच्या एड्रियन मन्नारिनोविरुद्ध क्रिकेटच्या स्टेट ड्राईव्हसारखा फटका रॅकेटने मारला. या फटक्याचा व्हिडीओ सचिन तेंडुलकरने सोशिअल साईट्सवर पहिला आणि तो रॉजरच्या त्या शॉटवर बेहद्द खुश झाला. त्याने लगेचच ट्विटरवर आपला संदेश पाठवत रॉजरचे कौतुक केले.

रॉजरचा आगळा व्हिडीओ टॅग करीत सचिनने लिहिले ,रॉजर तुझ्या खेळात नेहमीच हात आणि डोळे यांचा समन्वयपूर्वक वापर असतो. मन्नारिनोविरुद्ध खेळताना तू टेनिस रॅकेटने जो क्रिकेटसारख्या फटका खेळल्यास तो माझ्या मनाला भावलाय. यंदा नववे विम्बल्डन जेतेपद जिंकलेस की आपण भेटू. तू मला टेनिस शॉटचे धडे दे , मी तुला क्रिकेटच्या फटक्यांचे प्रशिक्षण देतो. सचिनच्या या स्तुतीने टेनिसचा सम्राट रॉजरही सुखावला आहे.

मी नोट्स घ्यायला तयारच आहे – फेडरर

सचिनच्या ट्विटला रॉजर फेडररने लगेचच उत्तर दिले आहे. रॉजर आपल्या ट्विटमध्ये म्हणतो ,सचिन वाट कशाला पाहायची? मी तुझ्याकडून नोट्स घ्यायला तयारच आहे. त्यावर सचिनने उत्तर दिले ,मित्रा तुझा पहिला धडा असेल स्टेट ड्राईव्हचा, तू मला बॅकहँड फटक्याचे धडे दे. मी यंदा विम्बल्डनमधील तुझा खेळ पहायला आलो नाही.  त्याबद्दल माफ कर, माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी सतत आहेत. पुढच्या विम्बल्डनला नक्कीच भेटू.

आपली प्रतिक्रिया द्या