सद्गुरु वामनराव पै यांच्या पत्नी शारदामाई पै यांचे निधन, 97व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जीवनविद्या मिशनचे संस्थापक सद्गुरु वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई पै यांचे वयाच्या 97व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील वजीरा नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज दुपारी 2वाजून 9 मिनिटांच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे त्यांचे पुत्र प्रल्हाद पै, कन्या मालन कामत, नातू निखिल पै, स्वप्निल कामत, नातसून प्रिया निखिल पै आणि पणतू यश पै असा परिवार आहे. शारदामाई यांच्या निधनाने जीवनविद्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळल्याची भावना व्यक्त होत आहे.

शारदामाई पै यांचे अंत्यदर्शन बोरिवली (पूर्व) येथील प्रभूस्मरण बंगला, ओम सिद्धराज हाउसिंग सोसायटी येथे सायंकाळपर्यंत घेण्यात आले. त्यानंतर बोरिवली पश्चिमेला असलेल्या सद्गुरु श्री वामनराव पै उद्यानाच्या बाजूला वजीरा नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सद्गुरू वामनराव पै यांच्या निधनानंतर जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक कार्यक्रमात शारदामाई यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. जीवनविद्या मिशनच्या नामधारकांना त्यांचे मातृतुल्य प्रेम, मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळत होता, अशा भावना जीवनविद्या परिवारात व्यक्त होत आहेत. शारदामाईंच्या जाण्याने जीवनविद्या मिशनमध्ये कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.