गोरगरिबांची मुले झाली फौजदार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

आई-वडिलांची हलाखीची परिस्थिती असताना अभ्यासाच्या जोरावर संभाजीनगर जिल्ह्यातील मुला-मुलींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान मिळविलेला आहे. परिस्थितीवर मात करीत यश मिळविणाऱ्या या मुला-मुलींचे सर्वत्र कौतुक होत आहे.

झोपडीत राहणाऱ्या पानगव्हाणच्या कल्पना कटारेचे यश
वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथून जवळच असलेल्या पानगव्हाण येथील खेडेगावातील अतिगरीब घराण्यात जन्मलेली कल्पना सुदाम कटारे हिचे वडील वाहनचालक असन, आई घरकाम करून मोलमजुरी करते व वडिलांना हातभार लावते. हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे व मुलांच्या शिक्षणासाठी खर्च पुरवणे यासाठी वडिलांना तारेवरची कसरतच करावी लागते. घरात पाच मुली आणि तीन मुले अशा एकूण दहा जणांची जबाबदारी एकट्या वडिलांवर असतानादेखील या पालकाने आपल्या पाचही मुलींना चांगले शिक्षण दिले. दोन मुलींचे विवाह झाले असून, तीन नंबरची कल्पना कटारे हिने घरात असलेल्या अठराविश्व दारिद्र्याला न जुमानता अभ्यासाच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेत उत्तमरीत्या यश संपादन केले असल्याने तिचे कुटुंब प्रचंड आनंदात आहे. कल्पना कटारेच्या आई-वडिलांना आजही राहण्यासाठी पक्के घर नाही. कल्पना कटारेचे प्राथमिक शिक्षण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण विद्यासागर कन्या प्रशाला, खंडाळा येथे घेऊन तिने पदवीचे शिक्षण वैजापूर येथील विनायकराव पाटील या महाविद्यालयात घेतले. तीन वर्षांच्या खडतर प्रवासातून पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेत यश संपादन केल्याने परिसरातून तिचे कौतुक होत आहे. तिची बहीण सुवर्णा कटारे व भाऊ उमेश कटारे हेदेखील एमपीएससीची तयारी करीत आहेत.