भुजबळ बंधूंचा दोषमुक्ततेसाठी अर्ज, ईडीचे अधिकारी गंभीर नाहीत का? सत्र न्यायालयाचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र समीर भुजबळ आणि पुतण्या पंकज भुजबळ यांनी कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात दोषमुक्ततेसाठी केलेल्या अर्जावर बुधवारीदेखील ईडीने आपले उत्तर सादर केले नाही. त्यावर सत्र न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करीत ईडीला पुढील सुनावणीला कोणत्याही परिस्थितीत उत्तर सादर करण्याचे बजावले.

याचवेळी ईडीचे अधिकारी गंभीर नाहीत का, असा संतप्त सवालही न्यायाधीश राहुल रोकडे यांनी उपस्थित केला. कथित महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा तसेच कलिना येथील भूखंड व्यवहाराशी संबंधित आर्थिक अफरातफरप्रकरणी भुजबळ बंधू तसेच इतर 51 आरोपींविरुद्ध ईडीने गुन्हा दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निर्णयाच्या आधारे भुजबळ बंधू तसेच संजय जोशी, तन्वीर शेख, सत्येन केसरकर आणि राजेश धारप यांनी दोषमुक्ततेसाठी विशेष सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जाची दखल घेताना सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी 15 सप्टेंबरला ईडीला आपले उत्तर सादर करण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाला तीन महिने उलटून गेले आहेत.

याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीलाही ईडी आपले उत्तर सादर करू शकली नाही. ईडीचे अधिकारी उत्तर सादर करण्यासाठी न्यायालयात हजर नसल्याचे पाहून सत्र न्यायाधीश राहुल रोकडे संतप्त झाले. यावेळी तपास यंत्रणेला फटकारताना ईडीचे अधिकारी गंभीर नाहीत का, असा जाब ईडीच्या वकिलांना विचारण्यात आला. याचवेळी ईडीच्या अधिकाऱयांनी पुढील सुनावणीला कोणत्याही परिस्थितीत आपले उत्तर सादर करावे, असे सक्त आदेश न्यायाधीशांनी दिले.