
क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर धाड टाकून थेट अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला तुरुंगात डांबणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आता ‘धर्म’संकटात सापडलेत. ‘कोऱया कागदावर सहय़ा घेऊन मला पंच बनवले’ असे प्रतिज्ञापत्र धाड प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल याने काल केले. या प्रकरणी वानखेडेंची चौकशी एनसीबीचे तीनसदस्यीय दक्षता पथक आता करणार आहे. साईलच्या आरोपांवर कोणत्याही न्यायालयाने कारवाई करू नये यासाठी वानखेडे कोर्टात गेले होते, पण ही याचिका फेटाळण्यात आली. त्यांच्या अडचणीत आज राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आणखीनच भर घातली. वानखेडे यांनी सरकारी नोकरीसाठी धर्म बदलला. ते मुस्लिमच आहेत, असा गंभीर आरोप करताना वानखेडेंचा जन्म दाखला आणि त्यांच्या पहिल्या लग्नाचा फोटोही पुराव्यादाखल ट्विट केला आहे. धर्मसंकटात सापडलेल्या वानखेडे यांनी दिल्ली गाठली असून त्यांची मुंबई एनसीबीतून उचलबांगडी होऊ शकते.
आर्यन खान प्रकरणात बॉडीगार्ड प्रभाकर साईलने एनसीबीवर गंभीर आरोप केले होते. प्रभाकर याने केलेले आरोप ग्राह्य धरू नयेत यासाठी वानखेडे यांनी विशेष सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. आर्यनबाबत मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण असल्याने सत्र न्यायालयाने वानखेडे यांची याचिका फेटाळून लावली. वानखेडे यांनी केलेल्या याचिकेत आपल्या कुटुंबीयांची बदनामी होत असून सोशल मीडियावर कुटुंबीयांची माहिती उघड होत आहे. याबाबत वानखेडे यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. प्रतिज्ञापत्रात तीन मागण्या केल्या होत्या. याचा परिणाम तपासावर होत असून तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती. मात्र सत्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.
गुंतवणूक करणारा बिल्डर कोण ः मलिक यांचा सवाल
क्रांती रेडकरच्या कंपनीत हवालामार्फत पैसा
समीर वानखेडे यांची दुसरी पत्नी क्रांती रेडकर हिच्या कंपनीत कोणत्या बिल्डरची गुंतवणूक आहे. कोणत्या माध्यमातून हवाला रॅकेटने हे पैसे पाठवत आहेत ही माहिती आज ना उद्या लोकांसमोर येईल, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
समीर वानखेडेच्या जन्माच्या दाखल्यावर वडिलांचे नाव दाऊद आहे. त्यांचा धर्म मुस्लिम आहे. त्या दाखल्यावर खोडाखोड केलीय. हा दाखला खोटा असेल तर खरा दाखला कोणता आहे? त्यांनी समोर आणावा. समीर वानखेडेच्या वडिलांनी धर्मांतर केले. दोन मुले जन्माला आली. त्यांचे जन्माचे दाखले आले आणि त्यानंतर वडिलांनी धर्मांतर लपून ठेवले. नोकरी केली तिथे कोणताही पुरावा दिला नाही, असे नवाब मलिक यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत धर्माच्या आड घेऊन प्रचार सुरू झाला होता. पण लोकांना माहीत नव्हते हा व्यक्ती जन्मापासून आजपर्यंत मुस्लिम आहे. ते तपासात पुढे येईल, असे मलिक म्हणाले.
मी धर्मनिरपेक्ष कुटुंबातील -वानखेडे
मी हिंदुस्थानच्या परंपरेतील एक संमिश्र, बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे आणि मला माझ्या वारशाचा अभिमान आहे. मी 2006मध्ये विशेष विवाह कायदा 1954 अंतर्गत नागरी विवाह समारंभात डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लग्न केले. 2016 मध्ये विशेष विवाह कायद्याअंतर्गत आम्ही दोघांनी दिवाणी न्यायालयाद्वारे परस्पर घटस्फोट घेतला. 2017 मध्ये मी क्रांती दीनानाथ रेडकर यांच्याशी लग्न केले, असेही त्यांनी सांगितले.
धर्मांतर केले नाही, पण सासू मुस्लिम होती -क्रांती रेडकर
वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर यांनी या धर्मांतराच्या आरोपावर उत्तर दिले आहे. क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर त्यांच्या विवाहाचा फोटो पोस्ट करून कमेंट केली आहे. मी आणि माझे पती समीर जन्मापासून हिंदू आहोत. आम्ही कधीच धर्मांतर केले नाही. आम्ही सर्वच धर्मांचा आदर करतो. समीरचे वडीलही हिंदू आहेत. माझी सासू मुस्लिम होती. आता ती या जगात नाही. समीरचे पहिले लग्न स्पेशल मॅरेज ऍक्टअंतर्गत झाले होते, असेही क्रांतीने सांगितले.
माझे नाव दाऊद कधीच नव्हते
माझे नाव दाऊद पहिल्यापासूनही कधी नव्हते. आताही नाही. जन्मल्यापासून माझे नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे आहे. शाळेत जाण्यापासून, कॉलेजला जाण्यापासून, एलएलबीला प्रवेश घेण्यापासून, डिपार्टमेंटला जाण्यापासून, रिटायर होण्यापासून माझे नाव ज्ञानदेव वानखेडे आहे. हे कुणीतरी गैरवापर करून किंवा बनावट केले असेल, त्याबद्दल मला काही बोलायचे नाही किंवा माहितीही नाही, अशी प्रतिक्रिया समीर वानखडे यांच्या वडिलांनी दिली आहे.
या प्रकरणाचे धागेदोरे दिल्लीपर्यंत
या प्रकरणातील साक्षीदाराचा बालही बाका होणार नाही. त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होईल. पण आम्ही त्याच्या पाठी आहोत. या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत आहेत. आता अनेक गोष्टी बाहेर येतील. मलिक यांनी काही गोष्टी बाहेर आणल्या. आता इंटरव्हलनंतर बाकीची स्टोरी मी सांगेन, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
गोसावी, परमबीर सिंह कुठे, हे भाजपला माहीत
के.पी. गोसावी, परमबीर सिंह कुठे, हे भाजपला माहीत असेल. गोसावीचा घातपात झाला की नाही हे ज्याने शंका उपस्थित केली तेच सांगू शकतील किंवा त्यांचे समर्थक पार्टीच सांगेल, असे ते म्हणाले. या महाराष्ट्राला बदनाम करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. सॅम डिसोजाचा संदर्भ मनी लॉन्ड्रिंगमध्ये येतो. बडय़ा लोकांचे पैसे तो परदेशात पाठवतो. माझी मागणी आहे, या प्रकरणाची चौकशी करावी, असंही त्यांनी सांगितलं.
बॉलिवूड कलाकारांकडून खंडणी मागण्यासाठी क्रूझ पार्टी प्रकरण केले की काय?
मुंबईची सिनेसृष्टी ही महाराष्ट्राचे वैभव आहे. त्याला, महाराष्ट्रातल्या काही लोकांना बदनाम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. बॉलीवूड कलाकारांकडून खंडणी मागण्यासाठी हे क्रूझ पार्टी प्रकरण केले की काय, असा सवाल करताना संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपाच्या लोकांना वाटते की, ते आकाशातून पडले आहेत. सगळे व्हिडीओ, पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करावी, असे माझे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांनी याचा तपास करण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना करावी, अशी मागणी होत आहे. पण हे केंद्रीय तपास यंत्रणांचे जे लोडणं आमच्या गळ्यात मारले आहे ते काढले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
मला आणि कुटुंबीयांना लक्ष्य केले जातेय
विशेष एनडीपीएस न्यायालयात समीर वानखेडे यांनी आज प्रतिज्ञापत्र दाखल केले. आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना जाणीवपूर्वक या प्रकरणात लक्ष्य केले जात आहे, असे त्यांनी त्यात नमूद केले आहे. आपली बहीण आणि दिवंगत आईलाही त्यात ओढले जात आहे. आपल्याला धमक्याही येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नोकरीसाठी वानखेडेंनी धर्म बदलला; नवाब मलिक यांनी जन्म दाखलाच दाखवला
राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नवाब मलिक यांनी आज वानखेडे यांचा जन्म दाखला आणि त्यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो ट्विट करून खळबळ उडवून दिली. समीर दाऊद वानखेडे का यहाँ से शुरू हुआ फर्जीवाडा, अशी टिप्पणी करत वानखेडे यांनी सरकारी नोकरीसाठीच धर्म बदलला असा आरोप केला. वानखेडे हे मुस्लिम आहेत. एका मशिदीत जाऊन ते भाषण देतात. एखाद्या मौलानापेक्षाही जास्त धार्मिक विषय ते सांगतात, असेही मलिक म्हणाले. पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलाचे नाव काय, त्याचा धर्म काय, तो कुठे शिकतो याचेही पुरावे माझ्याकडे असल्याचा इशाराही मलिक यांनी दिला. मलिक यांच्या या ट्विटनंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
प्रभाकर साईलला पोलीस संरक्षण
25 कोटींच्या ‘तोडपाणी’चे प्रतिज्ञापत्र करणारा एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने आज पोलीस संरक्षणासाठी सहार पोलीस ठाण्यात अर्ज केला आणि सहआयुक्त मिलिंद भारंबे यांचीही भेट घेतली. गृह खात्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन साईलला पोलीस संरक्षण दिले आहे.
एफआयआर होऊ दे, कारवाई करणार
एफआयआर दाखल करण्यासाठी कोणीतरी तक्रार द्यावी लागते. तशी तक्रार दिल्यावर पोलीस पुढील कारवाई करतील असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची बैठक झाली. या बैठकीनंतर गृहमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.




























































