
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
समझोता बॉम्बस्फोट प्रकरणातील खऱ्या सूत्रधारांना मोकाट सोडण्यात आले आणि निर्दोष लोकांना यात अडकवण्यात आल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. संसदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासामध्ये बोलताना त्यांनी हा आरोप करताना राजकीय हेतूने ही कारवाई करण्यात आल्याचेही म्हंटले.
बहुचर्चित समझोता स्फोट प्रकरणी एनआयए न्यायालयाने असीमानंदसह लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजिंदर चौधरी या चार आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. पंचकुलामधील हरयाणाच्या विशेष एनआयए न्यायालयाने हा निर्णय दिला होता. याबाबत बोलताना गृहमंत्री शहा म्हणाले की, समझोता बॉम्बस्फोट प्रकरणी यूपीए सरकारच्या काळात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, त्यावेळी यावर निर्णय होऊ शकला नाही. यात आमची काय चूक आहे. ज्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता त्यांच्याविरोधात एकही पुरावा नव्हता. फक्त राजकीय हेतून हा खटला दाखल केला होता, असेही शहा म्हणाले.
तसेच समझोता ब्लास्टप्रकरणी 7 लोकांना पकडण्यात आले होते. परंतु त्यानंतर विशेष धर्माला दहशतवादाशी जोडण्यासाठी खऱ्या सूत्रधारांना सोडून देण्यात आले आणि नवीन लोकांना पकडण्यात आले, असे गृहमंत्री अमित शहा संसदेत म्हणाले. तसेच ब्लास्टमध्ये मृत्यू पावलेल्या लोकांना मानवाधिकार आहे, परंतु काँग्रेस सरकारच्या काळात खऱ्या सूत्रधारांना सोडण्यात आल्याने पीडितांना न्याय मिळाला नाही. यात आमची चूक नाही, असेही शहा यावेळी म्हणाले.
HM in Rajya Sabha during debate on NIA (Amendment) Bill: 7 were arrested for Samjhauta Blast. A case was created to connect the blasts to a specific religion, culprits were released & new ppl were arrested. How could’ve they received punishment, there was no evidence against them pic.twitter.com/yAA5f0I1eY
— ANI (@ANI) July 17, 2019
काय आहे प्रकरण?
हिंदुस्थान आणि पाकिस्तान दरम्यान चालणार्या समझोता एक्सप्रेसमध्ये 18 फेब्रुवारी 2007 रोजी एक स्फोट झाला होता. या स्फोटात 68 लोकांचा मृत्यू झाला होता. बहुतांश मृतांमध्ये पाकिस्तानी नागरिकांचा समावेश होता. 26 जुलै 2010 रोजी हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले. यूपीए सरकारच्या काळात 26 जून 2011 रोजी चार्जशीट दाखल करण्यात आली होती.




























































