Box Office Collection – ‘सम्राट पृथ्वीराज’ फुस्स, 50 कोटी गाठतानाही नाकीनऊ; ‘भूल भुलैया-2’ दीडशे कोटी पार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोठा गाजावाजा करून प्रदर्शित झालेला ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट सपाटून आपटला आहे. विकेंडला दमदार कमाई केल्यानंतर या चित्रपटाला आगामी दिवसामध्ये चांगले दिवस येतील अशी शक्यता होती. परंतु सोमवारपासून कमाईमध्ये घटच होत असून पाच दिवसात 50 कोटींचा गल्ला जमवण्यातही या चित्रपटाला अपयश आले आहे.

अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी मोठी हवा करण्यात आली होती. ऐतिहासिक तथ्यांवर आधारित हा चित्रपट कोट्यवधींची कमाई करेन अशा वल्गना करण्यात आल्या होत्या. परंतु प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने विशेष कमाई केलेली नाही. या चित्रपटाने पाचव्या दिवशी फक्त 4.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून एकूण कमाई 48.80 कोटी रुपये झाली आहे.

पाच दिवसांची कमाई

पहिला दिवस (शुक्रवार) – 10.70 कोटी
दुसरा दिवस (शनिवार) – 12.60 कोटी
तिसरा दिवस (रविवार) – 16.10 कोटी
चौथा दिवस (सोमवार) – 5 कोटी
पाच दिवस (मंगळवार) – 4.25 कोटी

दरम्यान, या चित्रपटाचे आधीचे नाव ‘पृथ्वीराज’ असे होते. परंतु करनी सेनेच्या धमकीनंतर यात बदल करण्यात आला आणि ते ‘सम्राट पृथ्वीराज’ करण्यात आले. सम्राट पृथ्वीराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अक्षय कुमार हा सम्राट पृथ्वीराज तर मानुषी छिल्लर ही संयोगिताची भूमिका साकारत आहे. अक्षयच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे.

भूल भुलैया-2 जोमात

तीन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या भूल भुलैया-2 या चित्रपटाची जादू अद्यापही कायम आहे. जगभरामध्ये या चित्रपटाला रसिकांची पसंती मिळत असून आतापर्यंत या चित्रपटाने 159.23 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसह कियारा आडवाणी, तब्बू, राजपाल यादव आणि अमर उपाध्याय अशी तगडी स्टारकास्ट आहे.