
सामना प्रतिनिधी । राहुरी
वाळुच्या तस्करीतुन शेतकऱ्यांच्या विहीरीवरील मोटरपंप चोरून नेण्याच्या घटनांचे सत्र राहुरी तालुक्यात सुरू असतानाच वाळुतस्करांनी चक्क मुळा नदीपात्रातील वाळूने बनविलेला रस्ताच खरडवून नेल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील देसवंडी व तमनर आखाडा गावाकडे जाणाऱ्या मुळा नदीपात्रात ही घटना घडली. नदीपात्रातील रस्त्याची तोडफोड करत वाळु चोरून नेल्याने येण्या जाण्याचा मार्ग धोकादायक बनला आहे. नदीपात्रातील रस्ताच गायब झाल्याने देसवंडी व तमनर आखाडा गावाकडे राहुरी खुर्द, राजेश्वर महादेव या पर्यायी दुर अंतरावरील रस्त्याने दळणवळण सुरू झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नदीपात्रातील वाळुचा चोरट्या मार्गाने उपसा केला जात असताना महसुल व पोलीस प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष आजच्या घटनेला कारणीभूत ठरले आहे. मुळा नदीपात्रातील वाळुच्या अमर्याद उपशामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
नदीपात्रातील खड्ड्यात पाणी साचल्याने रात्रीच्या वेळी वाळु उपसा करून गाढवावरून वाहतुक केली जात आहे. हा वाळु उपसा रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात ही मागणी स्थानिक गावकऱ्यांनी करून देखील महसुल व पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
नदीपात्रातील वाळुचे प्रमाण घटल्याने वाळु तस्करांनी नदीपात्रातील येण्या जाण्याच्या रस्त्याला लक्ष्य करत या रस्त्याची तोडफोड करून वाळु उचलेगिरी सुरू केल्याने येण्या जाण्याचा मार्ग धोकादायक बनला आहे. राहुरी शहरातुन देसवंडी व तमनर आखाडा गावाकडे जाण्यासाठी मुळा नदीपात्रातून सोयीचा व जवळचा मार्ग असल्याने या रस्त्याने सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत गावकऱ्यांची तसेच शाळकरी मुलांची ये जा सुरू असते.
देसवंडी व तमनर आखाडा गावाकडे जाणारा रस्ता तोडण्यात आल्याची माहिती मिळताच संभाव्य धोका ओळखून शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांना घटनास्थळी पाचारण करत घडलेला प्रकार निर्दशनास आणुन दिला. खेवरे यांनी आज दुपारी जे.सी.बी.यंत्र मागवुन नदीपात्रात पर्यायी रस्त्याची तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी स्वखर्चाने मदतकार्य सुरू केले आहे.
मुळा नदीपात्रातील वाळु तस्करी साठी रस्त्याची तोडफोड करण्या-यांचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदार दौंडे यांनी मंडलाधिकारी व तलाठ्यास दिले आहेत. मात्र् महसुल प्रशासनाला हे उशीरा सुचलेले शहाणपण ठरले आहे.
मुळा नदीपात्रातील वाळु तस्करी ही सर्वश्रुत आहे.मात्र वाळु तस्करीसाठी चक्क रस्ताच गायब केल्याची घटना प्रथमच घडल्याने राहुरी तालुक्यात कायद्याचा धाक राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.





























































