
कोरोनाबाधित रुग्णांसह रुग्णवाहिका पळविण्याची घटना संगमनेर तालुक्यात ताजी असतानाच आज सकाळी पोलिसांनी चक्क दारू वाहतूक करणारी रुग्णवाहिका पकडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोनजणांना ताब्यात घेतले असून, सदरची देशी दारू शेडगाव येथे घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
चालक विजय खंडू फड (वय 42, रा. साईदर्शन कॉलनी, मालदाड रोड) व कैलास छबुराव नागरे (वय 49, रा. शेडगाव) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
संगमनेर बसस्थानकासमोर आज सकाळी वाहनांची तपासणी सुरू होती. बॅरिकेड्स लावल्यामुळे वाहनांची गर्दी झाली होती. या वाहनांच्या रांगेत रुग्णवाहिकाही होती. रुग्णवाहिकेच्या चालकाने अचानक सायरन सुरू करीत वेगात रुग्णवाहिका इतर गाडय़ांच्या पुढे घेऊन चेकपोस्टपर्यंत आणली. अचानक सायरन सुरू केल्यामुळे पोलीस निरीक्षक
मुकुंद देशमुख यांना संशय आला होता. गाडी जवळ येताच त्यांनी व्यवस्थित पाहिले असता मागील बाजूस रुग्ण नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी सदर गाडी बाजूला लावण्यास सांगितली असता गाडी थोडी दूर लावून चालक पोलिसांकडे आला. गाडीमध्ये रुग्ण नसताना सायरन का वाजवला, अशी विचारणा केली असता, चालकाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच वाढला. रुग्णवाहिकेची तपासणी केली असता आत चक्क देशी दारूच्या बाटल्यांचे पाच बॉक्स आढळून आले.
चालक विजय आणि त्याचा साथीदार कैलास या दोघांकडे चौकशी केली असता, त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेले. रुग्णवाहिकेतून दारू वाहतूक करणाऱया या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

























































