सांगलीत फरार सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस रेकॉर्डवरील पसार असलेल्या सराईत गुन्हेगारास पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले. सांगली-मिरज रस्त्यावरील भारती हॉस्पिटलजवळ ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, कारवाईनंतर एलसीबीच्या पथकाने आणखी दोघा साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून खुनी हल्ला, जबरी चोरी, घरफोडीसह 9 गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

अजय बापू कांबळे (वय -23, रा. राजीवगांधीनगर झोपडपट्टी, जुना बुधगाव रस्ता, सांगली), बापू उर्फ विश्वनाथ दिलीप काळे (वय -30), गेंडा ऊर्फ आकाश संतोष जाधव (रा. वाल्मीकी आवास) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

घरफोडी, जबरी चोरीसह 14 गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश पंडित पुजारी (वय 23, रा. वाल्मीकी आवास घरकुल) याच्यावर तीन महिन्यांपूर्वी पाचजणांनी तलवारीसह धारदार हत्याराने खुनी हल्ला केला. चोरीच्या सोन्याची वाटणी आणि पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला होता. तेव्हापासून कांबळे पसार होता.

कांबळे हा भारती हॉस्पिटलजवळ थांबला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक रवीराज फडणीस, पोलीस प्रवक्षर यादव, सूरज पाटील यांना मिळाली. त्यानुसार तातडीने सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. अजय कांबळे याच्याकडे चौकशी केली असता, त्याने साथीदारांसह राकेश पुजारी याच्यावर खुनी हल्ला केल्याची कबुली दिली. त्याने साथीदारांसह ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन घरफोडी केल्याचे समोर आले. तसेच, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीसह तीन गुन्हे, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील चोरी, कुपवाड औद्योगिक पोलीस ठाणे हद्दीतील चोरी, शिवाजीनगर पोलीस ठारे हद्दीतील चोरी, शिरोली औद्योगिक पोलीस ठाणे हद्दीतील चोरी असे 9 गंभीर गुन्हे उघडकीस आले. त्याच्या दोन साथीदारांना वाल्मीकी आवास परिसरातून अटक केली.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक फडणीस, उपनिरीक्षक अभिजित सावंत, नीलेश कदम, संजय कांबळे, इम्रान मुल्ला, प्रवीण यादव, सूरज पाटील, शशिकांत जाधव, कोमल धुमाळ, हेमंत ओणासे, विकास भोसले, संदीप गुरव, अनिल कोळेकर, संतोष गळवे, संदीप नलवडे, सुधीर गोरे, सोहेल कार्तियानी, आर्यन देशिंगकर यांनी ही कारवाई केली.