
सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना, महापालिका कर्मचारी मात्र आपल्या कर्तव्यावर होते. लक्ष्मीपूजनानंतर रस्त्यांवर पडलेला फटाक्यांचा कचरा अवघ्या चार तासांत महापालिका कर्मचाऱ्यांनी उचलत सांगली शहर स्वच्छ केले. या दोन तासांत मनपाकडे सांगलीमधून 20 टन आणि कुपवाड व मिरजेतून 10 टन असा एकूण 30 टन कचरा गोळा केला. आयुक्त सुनील पवार यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाने लक्ष्मीपूजनानंतर लगेचच कचरा उठाव केल्याने शहर रात्रीच स्वच्छ झाले आहे. याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दिवाळीकाळात लक्ष्मीपूजन ते पाडवा या दिवशीपर्यंत दररोज रात्री विशेष मोहीम घेऊन त्याच दिवशी कचरा उचलण्याची आणि तिन्ही शहरे स्वच्छ ठेवण्याची सूचना मनपा आयुक्त सुनील पवार यानी आरोग्य विभागाला दिली होते. आयुक्त पवार यांच्या सूचनेनुसार दिवाळी-लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सांगलीतील कापड पेठ, मारुती रोड, छत्रपती शिवाजी मंडई, हरभट रोड, बसस्टॅण्ड परिसर, सराफकट्टा या भागांतील कचरा रात्री 11 ते 3 या वेळेत उचलून रातोरात सांगली शहर स्वच्छ करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी दोन कॉम्पॅक्टर, 40 कर्मचारी, मुकादम, स्वच्छता निरीक्षक यांच्या संयुक्त पथकाने चार तासांत साधारण 20 टन कचरा संकलन करून व झाडलोट करून सांगलीच्या प्रमुख बाजारपेठांचा परिसर चकाचक केला. तर, मिरजेतही 20 कर्मचारी आणि चार वाहनांच्या आधारे स्वच्छता करून 10 टन कचरा संकलित करण्यात आला आहे.
पाडवा-भाऊबीजनिमित्तही रात्री स्वच्छता करण्याचे नियोजन केले आहे. वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर आणि मिरज-कुपवाडमध्ये अनिल पाटील आणि सर्व स्वच्छता निरीक्षक कार्यरत आहेत.

























































