
राजभवन ही राजकारण करण्याची जागा नाही. राजभवन ही घटनात्मक जागा असून, त्याची प्रतिष्ठा राखली जावी. राज्यपालांना राजकारण करायचं असेल तर राजभवनाच्या बाहेर या, मैदानात येऊन राजकारण करा, घटनात्मक पदाचा सन्मान आम्ही राखतो, ही आमची भूमिका आहे, अशा स्पष्ट शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सुनावले आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात संजय राऊत यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली
मराठा आरक्षण ः पंतप्रधान वेळ का देत नाहीत?
मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर बोलताना राऊत म्हणाले, मराठा समाजाला न्याय मिळावा, हीच आमची भावना आहे. छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले यांना चर्चेसाठी पंतप्रधान वेळ का देत नाहीत? असा सवाल त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चांगला संवाद असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. भाजप नेत्यांनी पंतप्रधानांकडे जाऊन आरक्षणाचा मुद्दा सोडवावा. त्याचे श्रेय त्यांनी घ्यावे. आरक्षणासाठी आम्ही सगळे एकत्र यायला तयार आहोत. कायदेशीर बाबी आणि न्यायालयीन बाबीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करीत आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.
तेजस्वी यादव बहुमताने बिहारचे मुख्यमंत्री
ज्या मुलाच्या पाठीमागे सध्या पाठबळ नाही, त्याच्या घरातली माणसं तुरुंगात आहेत. मग ती कोणत्याही कारणास्तव असो. त्याच्या पुटुंबाच्या पाठीमागे इन्कम टॅक्स, सीबीआयचा ससेमिरा लावला जातोय. तोच तरुण मुलगा हजारो, लाखोंच्या सभा घेतोय आणि केंद्रीय राजसत्तेला आव्हान निर्माण करतोय. बिहारच्या निवडणुकीचे एपंदर चित्र पाहिले तर उद्या तेजस्वी यादव बहुमताने बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण लोकभावना महत्त्वाची असते. ती दाबता येत नाही, असे संजय राऊत म्हणाले.
शरद पवार प्रेम करावे असेच व्यक्तिमत्त्व!
शरद पवार सरकार चालवतात, या चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवार हे आजच्या घडीला देशातील प्रमुख, अनुभवी आणि संयमी नेते आहेत. शरद पवार हे प्रेम करावे, असेच व्यक्तिमत्त्व आहे. युतीचे सरकार होते तेव्हा पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सरकार चालवतायत, असाच आरोप केला जात होता. आता जेव्हा तीन पक्षांचे सरकार आहे, तेव्हा सरकारमधील ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करीत आहेत. तिकडे पंतप्रधान मोदी पण इतर राज्यांना मार्गदर्शन करत असतात, सल्ला देतात; मग शरद पवारांनी सरकारला सल्ला दिला तर पोटात काय दुखतं? असा सवाल त्यांनी केला.
…हा तर महाराष्ट्राचा अपमान
महाराष्ट्रात लोकनियुक्त सरकार आहे. लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. विरोधी पक्षांनी राज्यातील प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री, मंत्र्यांकडे गेले पाहिजे. जर विरोधी पक्ष राज्यपालांकडे जात असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा स्पष्ट शब्दात संजय राऊत यांनी सुनावले.





























































