हेडमास्तर मोदींचा आदेश आला अन् ‘नीट’ परीक्षेसाठी आर्मी आणावी लागली; हे केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश, संजय राऊत कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या ‘नीट’ पेपरफुटीमुळे केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ‘नीट’ परीक्षेत कोणताही दगाफटका होऊन पुन्हा पेपरफुटीचा प्रकार घडू नये यासाठी नीटची प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी वायुदलाची मदत घेण्यात येणार आहे. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून परीक्षा घेण्यासाठी आर्मी आणावी लागत असेल तर हे केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश आहे, अशी टीका त्यांनी केली. ते शुक्रवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होत.

संजय राऊत म्हणाले, कालच मराठवाड्यामध्ये एका नीटच्या तरुणाने आत्महत्या केली आहे. महाराष्ट्र आणि देशातील असंख्य विद्यार्थी ज्यांनी नीटची परीक्षा दिली आणि देणार होते त्यांच्यात डिप्रेशनची भावना निर्माण झाली असून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना आपल्या भविष्याची चिंता वाटत आहे. याला सर्वस्वी जबाबदार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.

जसा दहशतवाद्यांचा अड्डा असतो तसा नीट पेपरफुटीचा अड्डा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मुख्यमंत्री असताना असा अड्डा महाराष्ट्रात आहे. ज्यांना सर्वकाही कळते, क्षणात निर्णय घेतात. ज्यांच्याकडे मिनिटा मिनिटाची माहिती येत असते… ज्यांचे गुप्तचर खाते खूप मोठे आहे. ते काय फक्त विरोधी पक्षाच्या लोकांवर पाळत ठेवण्यासाठी? त्यांचे फोन टॅप करण्यासाठी? असा सवाल राऊत यांनी केला. तसेच ही नाचक्की महाराष्ट्रामुळे देशावर आली. याची जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. जसे काल केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी जबाबदारी घेतली, तसेच त्यांनी समोर येऊन सांगायला पाहिजे की, हो मी जबाबदार आहे, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हे पेपरफुटीचे सगळ्यात मोठे केंद्र आहे आणि महाराष्ट्रातून जे आठ प्रमुख लोक पकडले हे सगळे भाजपशी संबंधित आहेत. नीटचे प्रमुख प्रदीप जोशी असून ते आरएसएसचे कडवट समर्थक आहेत. भाजप आणि आरएसएसच्या अत्यंत जवळचे असल्याशिवाय त्यांना नीटच्या प्रमुखपदी नेमलेच जाऊ शकत नाही. हे सगळे पेपर सेट करणारे लोक कोण आहेत? हे सगळे भाजपशी संबंधित लोक आहेत. त्याच्यामुळे पेपर फोडणारेही हेच लोक आहेत. याची जबाबादरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी.

सरकारवर नामुष्की, नीटच्या परीक्षेसाठी वायुदलाला जुंपणार; विद्यार्थ्यांच्या भवितव्याची लढाई एअरफोर्सच्या हाती

देशातील एक परीक्षा तुम्ही घेऊ शकत नसाल तर तुम्ही देशाचे काय रक्षण करणार आणि नवीन पिढीचे भविष्य घडवणार आहात? असा सवालही राऊत यांनी केला. हेडमास्तर मोदींचा आदेश आला आणि तुम्हाला परीक्षा घेण्यासाठी आर्मी आणावी लागते. आर्मीने काय काय करायचे? पाकिस्तान, चीन, भूतान सीमेवर रक्षण करायचे. निवडणुकीवेळी मतदान पेट्यांचे रक्षण करायचे आणि आता पेपरही पोहोचणार. ही या देशावर आलेली नामुष्की असून हे केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.