औरंगजेब, उस्मान तुमचा कोण लागतो? फडणवीस-शिंदे गट सरकारवर संजय राऊत यांची कडाडून टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औरंगजेब तुमचा अचानक नातेवाईक कधी झाला? तुमचा औरंगजेब कोण लागतो, निझामाच्या काळातील हा उस्मान तुमचा कोण लागतो, जे तुम्ही या निर्णयाला स्थगिती देताय? असा सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी फडणवीस-शिंदे गट सरकारला विचारला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णयाला नव्या सरकारने स्थगिती दिल्याचे कळते आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की या दोन शहरांची नावे बदलण्याचा निर्णय आणि नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव असे तीनही निर्णय फिरवल्याचे वृत्त खरे असेल तर हे सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही आहे.

नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलतान राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी केंद्राची पर्वा न करता, इतर कोणाचीही पर्वा न करता हिंमतीने एका हिंदुत्ववादी भूमिकेतून, लोकभावनेचा आदर म्हणून औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखी ढोंगी लोकं नाही. मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे हे सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारला हे निर्णय फिरवण्याचा अजिबात अधिकार नाही. कारण या सरकारबाबत निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात व्हायचा आहे.

ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयांना नव्या सरकारने दिलेल्या स्थगितीच्या वृत्ताबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, एकीकडे तुम्ही शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणून आक्रोश करताय, दुसऱ्या बाजूला तुम्ही याबाबत शिवसेनेने घेतलेले निर्णय स्थगित करताय. मला वाटतंय हे सरकार गोंधळलेलं आहे.सरकारच्या डोक्यावर र सर्वोच्च न्यायालयाची जी टांगती तलवार आहे त्यामुळे त्यांचा मेंदू बधीर झालाय त्यांना काही काम करावंस वाटत नाहीय. स्थगिती देतानाही त्यांनी आपला विवेक हरवला आहे.

लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या असंसदीय शब्दांच्या यादीबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, संसदेत यापुढे काहीच करता येणार नाही. बोलता येणार नाही, हालचाल करता येणार नाही. हातपाय बांधून तोंडावर चिकटपट्ट्या लावून आम्हाला जावं लागेल, या देशात आणीबाणीपेक्षा भयंकर परिस्थिती आहे. नव्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमध्ये आणीबाणीत ज्यांनी सहभाग घेतला त्यांना पेन्शन देण्याच्या निर्णयावर असलेली स्थगिती उठवली आहे. ती कशासाठी उठवलीत? ही नवी आणीबाणी आहे. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला पेन्शन द्यावी लागेल, कारण आम्ही आणीबाणीविरूद्ध लढत आहोत.