
पंतप्रधान नरेंद्र मोदी नॉर्वे दौऱ्यावर असताना नॉर्वेची पत्रकार हॅले लिंग हिने एक व्हिडीओ काढत पंतप्रधान मोदी तुम्ही पत्रकारांच्या एकही प्रश्नाचे का उत्तर देत नाही? असा प्रश्न केला होता. त्यावर पंतप्रधान मोदी काहीच उत्तर न देता तिथून निघून गेले. हा व्हिडीओ सध्या जगभरात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर हॅले लिंग हिचे फेसबुक इंस्टाग्राम अकाऊंटदेखील बंद करण्यात आले आहेत. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
”पंडित नेहरूनी अमेरिकेत जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. आपले पंतप्रधान फक्त परदेशात फिरायला जातात, फोटो काढतात, तिथे जाऊन नेत्यांना मिठ्या मारतात व तिथून निघून येतात. एकदा तरी पत्रकार परिषद घ्या. दिल्ली, मुंबई, नेदरलँड नाहीतर नॉर्वे मध्ये घ्या पण एकदा तरी पंतप्रधान पद जायच्य आधी पत्रकारांशी खुला संवाद करा. नॉर्वेतील प्रकारानंतर हॅले लिंगचे अकाऊंट ब्लॉक केले. तिने मोदींना प्रश्न केले म्हणून तिचे अकाऊंट ब्लॉक झाले. तिच्या अकाऊंटवर लोड आलाय हे कारण देण्यात आले आहे. लोड येणारच कारण संपूर्ण जगभरात यावर चर्चा सुरू आहे की जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान नॉर्वेच्या पत्रकाराच्या प्रश्नाला घाबरले. हॅले लिंगच्या प्रश्नानंतर मोदी तिथून पळून जाताना देखील दिसले हे चित्र भारतीय लोकशाहीसाठी व प्रतिष्ठेसाठी गंभीर आहे. पंतप्रधान परदेशात जातात पण जर तिथल्या लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणार नसाल तर जाताय कशाला? असा सवाल संजय राऊत यांनी केली.
मोदी गेल्या 12 वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. हॅले लिंगने हिंदुस्थानात सुरू असेलेल्या मानवअधिकारांच्या उल्लंघनाबाबत प्रश्न केला होता. हिंदुस्थानात मानवी अधिकारांचं उल्लंघन सर्व राज्यात होतोय. गुजरातसहित सर्व राज्यातील तुरुंगात सर्वत्र अनेक निरपराध लोकं कैद आहेत. गुजरातमध्ये संजीव भट कैद आहेत. अहमद बुहारी हे उद्योगपती यांची नुकतीच तीन वर्षानंतर तुरुंगातून सुटका झाली. त्यांची एनर्जी कंपनी होती. मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली ते तुरुंगात गेल्यानंतर त्यांची कंपनी गौतम अदानीने विकत घेतली. हे देखील मानवी अधिकारांचं उल्लंघन आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारणं हा राष्ट्रद्रोह ठरतोय. प्रेस फ्रिडम मध्ये हिंदुस्थान 157क्रमांकावर गेला याला जबाबदार पंतप्रधान आहेत. एकेकाळी हिंदुस्थान अभिव्यक्ती स्वातंत्र्यात वरच्या स्थानावर होता. फ्रिडम ऑफ प्रेस, फ्रिडम ऑफ एक्सप्रेशन सर्व काही होतं. पण आता 157 स्थानावर गेलायत कारण हे मानवी अधिकाऱ्याच्या उल्लंघनामुळे झालंय’, असे संजय राऊत म्हणाले.

























































