
आम आदमी पार्टीचे (AAP) नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी तृणमूल काँग्रेसमधील (TMC) फुटीवरून भाजपवर टीका केली आहे. देशातील लोकशाहीचा गळा घोटण्याचे हे कृत्य असल्याचे ते म्हणाले आहेत. दैनिक जागरणने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
संजय सिंह म्हणाले आहेत की, “टीएमसीमध्ये जे काही घडत आहे ते दुर्दैवी आहे. यांनी (भाजप) काँग्रेस, समाजवादी पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि आप या पक्षांना फोडले आहे. हे लोक ज्यांना बेईमान म्हणतात, त्यांनाच आपल्या पक्षात सामावून घेतात.”
संजय सिंह म्हणाले, टीएमसीसोबत जे काही घडत आहे, हे देशातील लोकशाहीचा गळा घोटण्याचे कृत्य आहे. जर देश यांच्या विरोधात जागा झाला नाही, तर भविष्यात निवडणुका आणि खासदार-आमदार यांचे कोणतेही महत्त्व उरणार नाही.
ते म्हणाले, “हे ज्यांना भ्रष्टाचारी ठरवतात, नंतर त्यांनाच आपल्या पक्षात सामील करून घेतात. आता फक्त दाऊद इब्राहिमचाच पक्षात प्रवेश व्हायचा बाकी आहे. बाकी सर्वजण तर आलेच आहेत. आता देशाला जागे व्हावेच लागेल, अन्यथा येणाऱ्या काळात हे लोक देशाची अवस्था अधिकच वाईट करतील.”

























































