
aकुस्तीपटूंच्या आक्रमक पवित्र्यानंतर हिंदुस्थानच्या क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाच्या नवनिर्वाचित समितीला बरखास्त करण्याचा निर्णय गेल्या काही दिवसांपुर्वी घेतला होता, मात्र क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या या निलंबनाच्या कारवाईविरोधात या समितीतर्फे न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. पुढील उपाययोजना आखण्याच्या दृष्टीने या समितीतर्फे 16 जानेवारी रोजी बैठक आयोजित केली आहे. कुस्ती महासंघाच्या निवडणुकीमध्ये संजय सिंह यांनी बाजी मारली, मात्र ते बृजभूषण सिंह यांच्या जवळचे असल्याने साक्षी मलिकने कुस्तीतून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली होती. तर बजरंग पुनियाने त्याला दिलेला ‘पद्म’ पुरस्कार पंतप्रधानांच्या निवासासमोरील फुटपाथवर ठेवून नाराजी व्यक्त केली होती. कुस्तीपटूंच्या आक्रमक पवित्र्यानंतर निवडणुकीनंतर अवघ्या तीनच दिवसांत क्रीडा मंत्रालयाने घटनेचे उल्लंघन केल्याचे कारण देत ही नवनिर्वाचित समिती बरखात्य करण्याचा आदेश दिला होता. मात्र हे निलंबन आम्हाला मान्य नाही. त्यामुळे पुढील आठवडय़ामध्ये आम्ही याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहोत. महासंघाची निवडणूक ही लोकशाही पद्धतीनेच पार पडली आहे.
























































