
पोहरागडाचे मठपती तपस्वी संत, बंजारा समाजाचे धर्मगुरू तसेच संत सेवालाल महाराजांचे वंशज असलेले डॉ. रामराव महाराज यांचे शुक्रवारी मुंबईत देहावसान झाले. रविवार, 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता पोहरादेवी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. डॉ. रामराव महाराज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱया पोहरादेवी गडाचे मठपती डॉ. रामराव महाराज यांना उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे शुक्रवारी रात्री देहावसान झाले. 7 जुलै 1935 रोजी डॉ. रामराव महाराजांचा जन्म झाला आणि 30 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

























































