
संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीमध्ये वारकऱयांचे खिसे कापणाऱया तब्बल 44 चोरटय़ांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. गेले काही दिवस स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वारकऱयांच्या वेशामध्ये वारीमध्ये सामील झाले असून, पोलीस प्रत्येक व्यक्तीवर बारकाईने लक्ष ठेवून होते.
वारकऱयांचे पैसे चोरीस जाऊ नयेत म्हणून स्थानिक गुन्हे शाखेची टीम तसेच इतर पोलीस ठाण्याचे कर्मचारी लक्ष ठेवून होते. यावेळी काहीजण वारकऱयांचे पाकीट चोरताना सापडले, तर काहीजण वस्तू चोरत होते. गेल्या चार दिवसांत वारीमध्ये 44 पाकीटमारांना पोलिसांनी पकडले आहे. यामध्ये नऊ महिलांचाही समावेश आहे. वारीमध्ये मग्न असलेले वारकरी हेरून चोरटे आपला डाव साधत होते. पोलिसांच्या चाणाक्ष नजरेमुळे चोरटय़ांचा डाव धुळीस मिळाला. त्यामुळे मोठा ऐवज वाचला.
पोलिसांना देत होते चकवा
चोरटय़ांना पकडण्यासाठी पोलीस साध्या आणि वारकरी वेशात होते, तर पोलिसांना चकवा देण्यासाठी काही चोरटेही वारकऱयांच्या वेशात पोलिसांना सापडले. त्यातील काही अट्टल पाकीटमार होते. पुणे, मुंबई येथून हे चोरटे वारीमध्ये सहभागी झाले होते. या संशयितांकडे सध्या पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

























































