मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे. उद्घाटनासाठी केलेल्या घाईमुळेच ही घटना घडली. मात्र, शौर्याचा मोठा इतिहास असलेल्या नौदलाच्या माथी स्वतःचे अपयश मारण्याचे पाप हे ‘महागळती’ राज्य सरकार करीत आहे. याबाबत राज्य सरकारने जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस नेते-आमदार सतेज पाटील यांनी केली.
आमदार सतेज पाटील यांनी आज मालवण येथे भेट दिली. सतेज पाटील म्हणाले, ‘या घटनेबाबत शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे. हा पुतळा उभारताना राज्य सरकारने योग्य खबरदारी घेतली नाही. केवळ उद्घाटनाची घाई आणि त्याचा इव्हेंट करायचा होता म्हणून अनुभव नसलेल्या व्यक्तीला पुतळा उभारणीचे काम देण्यात आले. प्रत्यक्षात पुतळा उभारणीवेळी राज्य सरकारचे कला संचालनालय काय करीत होते? छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्य सरकारचे हे वागणे अत्यंत दुर्दैवी आहे,’. दरम्यान, ‘महाविकास आघाडीच्या काळातच पुतळा उभारण्यात यावा, अशी छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असावी,’ असे सांगत, ‘या ठिकाणी आम्ही निश्चितच महाराजांचा भव्य पुतळा उभारू,’ अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
आपटेंची शिफारस कोणी केली?
पुतळा उभारणीचे काम ठाण्यातील आपटे नावाच्या व्यक्तीला कोणी दिले? त्यासाठी कोणाची शिफारस होती? देशभरात अनेक दिग्गज शिल्पकार असताना त्यांना या कामासाठी का नेमले गेले नाही? ‘पीडब्ल्यूडी’चे पत्र आताच व्हायरल कसे होते?’ असे सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केले.
वाऱ्याने झाडाची पानेही पडली नाहीत, पुतळा कसा कोसळला?
आमदार सतेज पाटील यांनी यावेळी स्थानिकांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी ‘या घटनेशी वाऱ्याचा काहीही संबंध नाही. या ठिकाणी झाडाची चार पानेही पडलेली नाहीत, मग पुतळा कोसळतोच कसा?’ असा उद्विग्न सवाल एका युवकाने केला.