सॅटेलाईटचा विवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हणकर

ज गभरातील अनेक प्रगत देश अवकाश संशोधनात रोज नव्याने भर घालत आहेत. विविध प्रकारच्या अभ्यासासाठी अनेक देशांनी आपापले सॅटेलाईटस् अर्थात उपग्रह आकाशात सोडलेले आहेत. अंतराळाचा, पृथ्वीचा, विविध ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी, पर्जन्याचा अंदाज बांधण्यासाठी, सैन्याला मदत करण्यासाठी आणि टेहळणीसाठी अशा विविध कामांसाठी या उपग्रहांचा उपयोग होत असतो. या उपग्रहांची फारशी चर्चा होत असते. मात्र आता उत्तर कोरियाने सोडलेल्या उपग्रहाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यासंदर्भात भिन्न भिन्न प्रकारचे दावेदेखील करण्यात येत आहेत.

या वादाला तेव्हा सुरुवात झाली, जेव्हा उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग-उन यांनी असा दावा केला की, त्यांनी सोडलेला उपग्रह अमेरिकेच्या व्हाईट हाउस, अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पँटेगॉन आणि अमेरिकेच्या पूर्व आणि उत्तर किनारपट्टीवर बांधलेले हवाई तळ अशा प्रमुख ठिकाणांवर नजर ठेवून आहे. उत्तर कोरियाने सोडलेला हा उपग्रह अत्यंत कमी दर्जाचे मेगापिक्सल असलेला कॅमेरा वापरत असल्याने, त्याने काढलेले फोटो आणि त्याच्या एकूणच कार्यक्षमतेविषयी अनेक देशांच्या संशोधकांनी पूर्वीच संशय व्यक्त केला होता. काही संशोधकांनी तर हा उपग्रह काम करत नसल्याचे आणि उत्तर कोरियाची मोहीम फसल्याचादेखील दावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

या उपग्रहावरील वादाला तोंड फोडणाऱया चर्चेला अधिक जोर तेव्हा आला, जेव्हा अमेरिकेच्या प्रमुख संस्थांसह दक्षिण कोरियाचे सैन्यतळ, तेथील बंदराचे शहर असलेले बुसान आणि इटलीची राजधानी रोमदेखील या उपग्रहाच्या नजरेच्या टप्प्यात असल्याचा दावा उत्तर कोरियातर्फे करण्यात आला. उपग्रहाच्या नजरेतील टप्प्यांची यादी जाहीर करून उत्तर कोरियाने एक प्रकारे अमेरिका आणि जगाला इशारा दिला आहे असे काही संशोधक मानतात. मात्र या उपग्रहाने काढलेला एकही फोटो आजवर उत्तर कोरियातर्फे सार्वजनिक करण्यात आलेला नाही. पुरावा जोवर मिळत नाही तोवर उत्तर कोरियाचा हा दावा खोटा मानला जावा असे अनेक संशोधकांचे मत आहे.

उत्तर कोरियाच्या राजकारणाचा अभ्यास करणारे संशोधक हा दाव फेटाळून लावतात. त्यांच्या मते उत्तर कोरियाला कायम खोटे बोलण्याची आणि लहानसहान गोष्टीदेखील विनाकारण मोठय़ा करून दाखवण्याची सवय आहे. खोटेपणा हा उत्तर कोरियाचा मूळ स्वभाव आहे. खोटे फोटो प्रसारित करून आपल्या सैन्यबळाचा खोटा जोर दाखवणे, अतिशयोक्ती करून आपल्याकडील शस्त्रास्त्रांची बढाई मारणे असे प्रकार पूर्वीदेखील उत्तर कोरियाने केले असल्याकडे संशोधक लक्ष वेधत आहेत. सध्या करण्यात आलेला दावादेखील जगाला आपली तंत्रज्ञानातील ताकद किती वाढली आहे याची बढाई मारण्याचा प्रयत्न असू शकतो असेदेखील संशोधकांना वाटत आहे.

काही संशोधकांनी मात्र उत्तर कोरियाचा हा इशारा गंभीरपणे घेतला आहे. जगावर आपल्याला उपग्रहामार्फत नजर ठेवता यावी हे उत्तर कोरियाचे पहिल्यापासून स्वप्न आहे, अनेक पाश्चात्य देश अवकाशातून उपग्रहाच्या माध्यमाने 24 तास उत्तर कोरियावर लक्ष ठेवून असतात याचादेखील उत्तर कोरियाला प्रचंड संताप आहे. जर उत्तर कोरियाचा दावा खरा असेल तर त्यांनी या क्षेत्रात मारलेली भरारी दुर्लक्षित करून चालणार नाही, असे सुरक्षा क्षेत्रातील काही संशोधक सांगतात. आपला उपग्रह किती कार्यशील आहे याचा इतर देशांना अंदाज येऊ नये आणि यासाठी कदाचित उत्तर कोरियाने या उपग्रहाने पाठवलेली छायाचित्रे सार्वजनिक केली नसावीत असादेखील एक अंदाज आहे.

ज्याप्रमाणे पाश्चात्य देश आपली नजर उत्तर कोरियातील प्रमुख ठिकाणांवर रोखून असतात, आता त्याचप्रमाणे उत्तर कोरियादेखील या देशांच्या प्रमुख लष्करी संस्था, कार्यालये यांच्यावर नजर रोखून आहे आणि उत्तर कोरियावर हल्ला केल्यास तोदेखील या देशांच्या प्रमुख संस्थांवर, सैन्यतळांवर हल्ले करण्यास सक्षम आहे असा संदेश किम जोंग-उन यांनी दिलेला आहे असे सुरक्षा क्षेत्रातील काही अभ्यासक मानतात. या सर्व वादानंतर आता उत्तर कोरिया काय भूमिका मांडते ते महत्त्वाचे असणार आहे.

[email protected]