
विलेपार्ले (पू) येथील पार्ले टिळक असोशिएशनच्या साठ्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S) विभागाअंतर्गत होणाऱ्या महोत्सवासाठी साठ्येतील तरुणाई सज्ज झाली आहे. ‘जाणीव’ या सामाजिक महोत्सवाच्या माध्यमातून ‘युवा बदलाची सुरुवात माझ्यापासून’ ह्या मध्यवर्ती संकल्पनेद्वारे विचारमंथन घडवून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न ह्या महोत्सवातून करण्यात येणार आहे.
‘युवाशक्ती ही देशाची एकमेव खरी संपत्ती आहे’, असे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे. युवकांनी एकत्र येऊन सामाजिक प्रश्नांना वाचा फोडावी व समस्या निराकरणाच्या प्रकियेमध्ये सहभागी होऊन आपले विचार मांडावे. अशा परिवर्तनवादी विचार असलेल्या ‘जाणीव’ चे 16 ते 17 डिसेंबर या दोन दिवसात आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र आणि पर्यायाने विश्वाला प्रगतीपथावर नेण्याचे अफाट सामर्थ्य हे केवळ तरुणांमध्ये असते. हे सर्वमान्य असले तरी युवकांसमोर आज विविध समस्या उभ्या राहिल्या आहेत. या सर्व आव्हानांना मात करण्यासाठी तरुणांना पुढे नेणे आवश्यक असते. त्यासाठी या महोत्सवात पथनाट्य, ओपन माईक, पोस्टर विथ् स्लोगन मेकिंग, समूहनृत्य अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून युवकांना आपले विचार अभिनव पद्धतीने मांडण्यासाठी हा विचारमंच उपलब्ध करुन दिला जाईल.
नशामुक्त समाज, युवकांच्या समस्या, शैक्षणिक असमानता, समाज माध्याम वयाआधी वयात येणे अशा अनेक सामाजिक समस्यांना हात घालण्याचा प्रयत्न ह्यानिमित्ताने केला जाणार आहे. तरुणांनी स्वत: सहभाग घेऊन सामाजिक परिवर्तनाने सुरुवात करावी. ‘चला….सहभागी होऊ या! कारण… बदलाची सुरुवात माझ्यापासून’ असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. दरम्यान मुंबई, पालघर, ठाणे या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेत मोठ्या उत्सवाने या महोत्सवात सहभागी होत असताना, या वर्षीही विद्यार्थांचा उदंड प्रतिसाद मिळेल असा विश्वास कार्यक्रम अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.


























































