Corona Effect : अनेक उद्योगांचे नुकसान; मदतीसाठी एसबीआय देणार विशेष कर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जगातील अनेक अर्थव्यवस्थांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. तसेच शेअर बाजाराचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक लहान मोठ्या कंपन्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक असणारी भारतीय स्टेट बँक (एसबीआय) उद्योगपतींच्या मदतीसाठी पुढे आली आहे. संकटात सापडलेल्या उद्योगपतींसाठी एसबीआयने नवीन योजनेची घोषणा केली आहे.

कोरोना व्हायरसमुळे उद्योगात फटका बसलेल्या उद्योगपतींना अतिरिक्त निधी देण्यासाठी एसबीआयने नवी योजना आखली आहे. ‘कोविड-19 इमरजेंसी क्रेडिट लाइन’ (CECL) असे या योजनेच नाव असून या योजनेचा लाभ 30 जूनपर्यंत घेता येणार आहे. या योजनेनुसार कॅपिलटल लिमिटपेक्षा 10 टक्के निधी कर्जरुपात मिळणार आहे. कर्जासाठी 200 कोटींपर्यंतची सर्वाधिक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या कर्जावर 7.25 दराने व्याज आकारण्यात येणार आहे. तसेच या कर्जासाठी कोणतीही प्रोसेसिंग फी नसून प्रीपेमेंट पॅनेटी आकारण्यात येणार नाही. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या उद्योगपतींच्या मदतीसाठी एसबीआयने हात पुढे केला आहे. त्यामुळे इतर बँकाही उद्योगपतींच्या मदतीसाठी पुढे येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

एसबीआयच्या या योजनेमुळे लघु आणि मध्यम उद्योजकांना मोठी मदत मिळणार आहे. ते आपला उद्योगधंदा कमी व्याजदरात कर्ज घेऊन पुन्हा सुरू करू शकणार आहेत. तसेच त्या कर्जाची कोणत्याही पॅनेल्टीशिवाय परतफेड करू शकणार आहेत. कोरोनामुळे अनेक उद्योगात तात्पुरत्या स्वरुपात मंदी आली आहे. त्यामुळे उद्योगांना पैशांची अडचण येत आहे. ही अडचण लक्षात घेत बँकेकडून ही योजना आखण्यात आली आहे. या कर्जाची मर्यादा 12 महिन्यांची असेल. त्यामुळे कर्ज मिळाल्यानंतर ते वर्षभरात फेडावे लागणार आहे. या यजोनेचा लाभ स्टँडर्ड खातेधारकांना मिळणार आहे. महिनाभर किंवा 16 मार्चपर्यंत कोणतेही ड्यूज शिल्लक नसलेल्यांना याचा फायदा होणार आहे. याआधी ज्या कर्जदारांनी छोट्या उद्योगांसाठी कर्ज घेतले आहे, त्यांनाही याचा फायदा घेता येणार आहे.