
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थांची समिती नेमली आहे. माजी न्यायमूर्ती एफ.एम.आय. खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ श्रीराम पंचू हे समितीचे सदस्य आहेत. समितीचे कामकाज गोपनीय राहणार असून आठ आठवड्यांत सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करावा लागणार आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने काल मध्यस्थ नेमण्याचा निकाल राखून ठेवला होता. निर्मोही आखाडा आणि सुन्नी वफ्फ बोर्डाने मध्यस्थ नेमण्यास अनुकूलता दर्शविली होती, तर हिंदू महासभेने विरोध केला होता. आज घटनापीठाने तीन सदस्यांची मध्यस्थ समिती जाहीर केली. पक्षकारांनी सुचविलेल्या नावानुसार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये श्री श्री रविशंकर आणि श्रीराम पंचू हे सदस्य असतील असे घटनापीठाने जाहीर केले.
रविशंकर यांच्या मध्यस्थीला निर्मोही आखाड्याचा विरोध
श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीला निर्मोही आखाड्याचे महंत सीताराम दास यांनी विरोध दर्शविला आहे. मध्यस्थांच्या यादीत घटनात्मक व्यक्तीचे नाव असावे असे आम्हाला वाटते. यापूर्वीही रविशंकर यांनी मध्यस्थी केली होती. त्यावेळी राजकारण झाले होते. म्हणून या समितीत घटनात्मक व्यक्ती हवी, राजकीय नसावी अशी भूमिका महंत सीताराम दास यांनी मांडली आहे. दरम्यान, ‘एमआयएम’चे नेते असुदुद्दीन ओवेसी यांनीही रविशंकर यांच्या नियुक्तीला विरोध केला आहे.
हे आहेत मध्यस्थ
एफ.एम.आय. खलीफुल्ला : 68 वर्षीय माजी न्यायमूर्ती एफ.एम.आय. अर्थात फकीर मोहम्मद इब्राहिम खलीफुल्ला हे मूळचे तामीळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यातील कराईकुडीचे आहेत. खलीफुल्ला यांची 2000 मध्ये मद्रास उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. 2011 मध्ये ते जम्मू-कश्मीर हायकोर्टाचे न्यायमूर्ती बनले. 2 एप्रिल 2012 ला सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती झाले. 2016 मध्ये ते निवृत्त झाले आहेत.
श्रीराम पंचू : 69 वर्षीय श्रीराम पंचू हे ज्येष्ठ विधिज्ञ असून त्यांनी यापूर्वी अनेकदा मध्यस्थाची भूमिका पार पाडली आहे. कोर्टाबाहेर मध्यस्थी करून प्रकरणे सोडविण्यासाठी ‘द मीडिएशन चेंबर्स’ ही एक संस्थाही त्यांनी स्थापन केली आहे. देशातील अनेक कठीण आणि अतिमहत्त्वाच्या प्रकरणांमध्ये त्यांनी मध्यस्थ म्हणून काम केले आहे. व्यावसायिक, कॉर्पोरेट प्रकरणांचा यात समावेश आहे. आसाम आणि नागालँडमधील 500 किमी. भूभागाचे प्रकरण, मुंबईतील पारसी समाजाच्या प्रकरणांमध्ये श्रीराम पंचू हे मध्यस्थ होते.
श्री श्री रविशंकर : 62 वर्षीय आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर हे आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आहेत. देश-विदेशांत त्यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रसार आहे. यापूर्वीही रविशंकर यांनी वैयक्तिक स्तरावर अयोध्या प्रकरण सोडविण्याचा प्रयत्न केला होता. सर्वोच्च न्यायालयाने रविशंकर यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केल्यानंतर अनेक साधुसंतांनी विरोध केला आहे.
प्रक्रिया गोपनीय; मीडियाला बंदी
- मध्यस्थांच्या समितीचे कामकाज अयोध्येपासून 8 कि.मी. दूर फैजाबाद येथे चालणार आहे. कामकाजाची प्रक्रिया गोपनीय असेल. मीडियाला बातम्या प्रसारित करण्यास प्रतिबंध असणार आहे.
- या समितीचे सदस्य किंवा संबंधित पक्षकार या प्रक्रियेची कोणतीही माहिती सार्वजनिक करणार नाहीत असे खंडपीठाने बजावले.
- संपूर्ण प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालेल. मध्यस्थांची समिती आपले काम एक आठवड्यात सुरू करेल आणि पुढील आठ आठवड्यांमध्ये आपला अहवाल सुप्रीम कोर्टात सादर करेल.
- गरज असेल तर मध्यस्थ समितीमध्ये आणखी सदस्य नियुक्ती केली जाईल. फैजाबादमध्ये होणार्या कामकाजासाठी मध्यस्थांना उत्तर प्रदेश सरकारने सोयीसुविधा द्याव्यात. तसेच मध्यस्थ कायदेशीर मदतही मागू शकतात, असेही घटनापीठाने स्पष्ट केले.

























































