
मुंबई शेअर बाजारात आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी ब्लॅक फ्रायडे ठरला. शुक्रवारी दुपारपर्यंत सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला होता. यामुळे सेन्सेक्स हा गेल्या 3 महिन्यातील नीचांकी पातळीवर आला आहे. बुधवारपासून या घसरणीला सुरुवात झाली होती, जी अद्याप थांबलेली नाही. शुक्रवारी ही घसरण अधिक वेगाने होत गेली आहे. या घसरणीमुळे सामान्य गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बँकीग क्षेत्रातील समभागांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याने ही घसरण पाहायला मिळत असल्याचे सांगितले जात आहे. यातच अडाणी समूहाबाबतच्या हिंडेनबर्ग अहवालामुळे देखील शेअर बाजार आणि गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत.
तेजी आणि मंदी
आज दिवसभर ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या शेअर्समध्ये तेजी असल्याचे पाहायला मिळाले. टाटा मोटर्स, एम अँड एम, टाटा स्टील, आयटीसी, मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एचसीएल टेक, एल अँड टी, इन्फोसिस आणि विप्रो सेन्सेक्स पॅक या कंपन्यांने समभाग सेन्सेक्स पडत असतानाही तेजीत दिसत होते. याउलट बँकींग क्षेत्रातील समभाग मात्र आज जबरदस्त आपटले. आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, एशियन पेंट, रिलायन्स, कोटक महिंद्रा, इंडसइंड बँक, टीसीएस आणि सन फार्मा या समभागांच्या किंमतींमध्ये मोठी घट झालेली पाहायला मिळाली.