सीरमकडून ‘कोविशिल्ड’ लसीचा दर जाहीर, जाणून घ्या किती पैसे मोजावे लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर आता कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने लसीच्या दराची घोषणा केली आहे. ‘सीरम इन्स्टिट्यूट’ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

कोरोनाचा नवीन स्ट्रेन देशात वेगाने पसरत आहे. गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 30 लाख रुग्ण आणि 2 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणात तेजी आणण्यासाठी केंद्र सरकारने लस निर्मितीला वेग देण्याचा निर्णय घेतला असून लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना 50 टक्के लसीची खुल्या बाजारात विक्री करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ‘सीरम’ने देखील उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पत्रकात देण्यात आली आहे.

येत्या दोन महिन्यांमध्ये लसीचे उत्पादन वाढवून तुटवड्याच्या समस्येला मात देऊ, असा विश्वास ‘सीरम’ने व्यक्त केला आहे. येत्या काळात निर्माण होणाऱ्या लसीपैकी 50 टक्के लस केंद्र सरकारच्या लसीकरण कार्यक्रमासाठी पुरवली जाईल. तर उर्वरीत 50 टक्के लस राज्य सरकार व खासगी रुग्णालयांना दिली जाईल, असेही ‘सीरम’ने आपल्या पत्रकात नमूद केले आहे.

असा आहे दर

‘कोविशिल्ड’ लसीसाठी राज्य सरकारला प्रति डोस 400 रुपये, तर खासगी रुग्णालयांना 600 रुपये मोजावे लागणार आहेत. अमेरिका, रशिया व चीनमधील लसीच्या तुलनेत ‘कोविशिल्ड’ स्वस्त असल्याचे ‘सीरम’ने म्हटले आहे. तसेच येत्या चार-पाच महिन्यात ‘कोविशिल्ड’ खुल्या बाजारात उपलब्ध करून दिली जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

विदेशातील लसीचा दिला दर

दरम्यान, सीरमने आपल्या पत्रकामध्ये विदेशातील लसीचे दरही दिले आहे. अमेरिकेत 1500, रशियात 750, तर चीनमध्ये 750 रुपये मोजावे लागत आहे. या तुलनेत कोविशिल्ड स्वस्त असल्याचे कंपनीने म्हटले आहे.