दारू मिळाली नाही म्हणून सॅनिटायझर प्यायले, सात जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सॅनिटायझर प्यायल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना यवळमाळच्या वणीमध्ये घडली आहे. लॉकडाऊनमुळे दारुची दुकानं बंद असल्याने, तल्लफ भागवण्यासाठी सॅनिटायझर प्यायले आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला, असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. दरम्यान या सात जणांचा मृत्यू सॅनिटायझर पिऊन झाल्याच्या वृत्ताला वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनीही दुजोरा दिला आहे. दत्ता लांजेवार ,विजय बाकणे, नूतन पाथरटकर, संतोष मेहरे, सुनील ढेंगळे, गणेश शेलार, भारत रुईकर अशी मृतांची नावं आहेत.

चार मृतदेहांवर नातेवाईकांनी परस्पर अंत्यसंस्कार केले असून तीन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. सॅनिटायझर प्यायल्याने त्यांना त्रास सुरु झाला आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती मृतांच्या नातेवाईकांनी वणी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना दिली.