नवाकोरा बंगला बघतोय सहाय्यक वनक्षेत्रपालांची वाट

लाखो रुपये खर्च करून नवाकोरा बंगला तयार केला. मात्र गेल्या वर्षभरापासून शहापूर वन्यजीव विभागाला अधिकारीच मिळत नसल्याने कुणी सहाय्यक वनक्षेत्रपाल देता का वनक्षेत्रपाल ? अशी म्हणण्याची वेळ आली आहे. जुलै 2023 मध्ये सहाय्यक वनसंरक्षक निवृत्त झाल्यानंतर आतापर्यंत या पदावर कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. हे रिक्त पद लवकर भरावे यासाठी अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र तरीदेखील हे पद न भरल्याने संताप व्यक्त होत आहे.

तानसा, खर्डी, वैतरणा, परळी हे चार वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत. हे चार वनपरिक्षेत्र सहाय्यक वनसंरक्षक यांच्या देखरेखीखाली चालतात. वन्यजीवांचे संरक्षण करणे व वन्यजीव विकासाच्या संवर्धनासाठी दरवर्षी राज्य सरकारच्या वन मंत्रालयाच्या विविध योजनांच्या माध्यमातून येथे लाखो रुपयांची विकासकामे केली जातात. सरकारी कामकाज व चारही वनपरिक्षेत्र कार्यालयांवर नियंत्रण ठेवणारे महत्त्वाचे अधिकारी म्हणून सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी आहेत. मात्र शहापूर तानसा वन्यजीव विभागाला गेल्या वर्षभरापासून सहाय्यक वनसंरक्षक मिळत नसल्याने वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खर्डी वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे त्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवावा लागला आहे. तब्बल वर्ष होत आले तरीही येथे सहाय्यक वनसंरक्षकांची नव्याने नेमणूक करण्यात मंत्रालयातील वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी चालढकल करीत आहे.

निवासस्थान रिकामे

शहापूर वन्यजीव कार्यालयाजवळ गेल्या वर्षी लाखो रुपये खर्च करून सहाय्यक वनसंरक्षकांसाठी असलेल्या सरकारी निवासस्थानाचे नूतनीकरण करण्यात आले. सरकारी निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी जेवढी तत्परता वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखवली तेवढी तत्परता तानसा वन्यजीव विभाग सहाय्यक वनसंरक्षकांचे रिक्त झालेले पद तातडीने भरण्यात का दाखवली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. नूतनीकरण करूनही हे निवासस्थान रिकामे असल्याने लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.