देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही! शरद पवार यांनी विरोधकांच्या आरोपातील हवाच काढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱया विरोधकांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज हवाच काढली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात ज्या तारखांचा उल्लेख आहे, त्या काळात देशमुख हे कोरोनामुळे क्वारंटाइन होते, असे पवार यांनी सांगितले.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशमुखांचा व्हिडीओ ट्विट करत ‘त्या’ दिवशी पत्रकारांशी बोलला ‘तो’ कोण असा सवाल केला आहे. तर 15 फेब्रुवारीला मी हॉस्पिटलबाहेर येताना पत्रकारांशी बोललो, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. परमबीर यांच्या पत्राचे पडसाद आज संसदेतही उमटले आणि दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला.

‘त्या’ दिवशी देशमुख क्वारंटाइन होते

परमबीर सिंग यांच्या पत्रात ज्या तारखांचा उल्लेख आहे त्या काळात गृहमंत्री अनिल देशमुख कोरोनाचे उपचार घेत होते. त्यामुळे विरोधकांच्या मागणीत काहीच अर्थ नाही. देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांना सुनावले.

राजधानीत पत्रकारांशी संवाद साधताना पवारांनी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा तपशील वाचून दाखविला. या पत्रात फेब्रुवारीच्या मध्यात गृहमंत्र्यांनी आपल्याला पैशांच्या टार्गेटबाबत वाझेंमार्फत सूचना दिल्या होत्या, असे नमूद केले आहे, मात्र 6 फेब्रुवारी ते 15 तारखेपर्यंत देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात होते.

त्यानंतर 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत ते नागपुरात राहत्या घरी होम क्वारंटाईन होते. त्यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप व वस्तुस्थिती यात खूपच तफावत आहे. कोरोनासारख्या आजारात देशमुख कोणाला भेटण्याची शक्यताच नव्हती आता हे सिद्ध झाले आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

अनिल देशमुख–वाझे भेट ही धूळफेक

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपात अनिल देशमुख व निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची फेब्रुवारीमध्ये भेट झाल्याचा आरोप केला होता, मात्र फेब्रुवारीत देशमुखांना कोरोना झाला होता. त्यामुळे ही भेट झाल्याची नुसती फेकाफेक असल्याचेही पवारांनी स्पष्ट केले.

मग पत्रकारांशी बोलला ‘तो’ कोण?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री देशमुख यांचा पत्रकार परिषदेतील व्हिडीओ ट्विट करत पवारांचा दावा खोडून काढला. 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाइन होते, असे पवार साहेब सांगतात; पण, 15 ला सुरक्षा रक्षकांसह माध्यम प्रतिनिधींसमोर अशी पत्रकार परिषद घेणारे ‘ते’ नेमके कोण, असा प्रश्न फडणवीस यांनी केला आहे.

दिशाभूल कोण करते?

परमबीर सिंग यांच्या पत्रावर शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही असे स्पष्टपणे दिसून येते. या पत्रात नमूद केलेला ‘एसएमएस’चा पुरावाच ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झाल्याचे सांगतो. आता नेमके कोण दिशाभूल करते आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हॉस्पिटलबाहेर मी पत्रकारांशी बोललो

कोरोना झाल्यामुळे मी 5 ते 15 फेब्रुवारीदरम्यान नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. 15 फेब्रुवारीला माझा डिस्चार्ज झाला. रुग्णालयामधून बाहेर पडत असताना गेटवर काही पत्रकार होते. त्यावेळी माझ्या अंगात त्राण नव्हते. तेव्हा मी हॉस्पिटलमध्येच खुर्चीवर बसलो आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यानंतर मी घरी जाऊन होम क्वारंटाइन झालो.

28 फेब्रुवारीला पहिल्यांदा घराबाहेर

हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत मी होम क्वारंटाइन होतो. त्यानंतर 28 फेब्रुवारीला मी पहिल्यांदा घराबाहेर पडत ‘सह्याद्री’ गेस्टहाऊसला मीटिंगला गेलो, असं स्पष्ट करत अनिल देशमुख यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.