
धनाचा वापर करून माणसं फोडून सरकार बनवली जातात, त्याला कर्नाटक देखील अपवाद नाही. अशा पैशाचा वापर करून सरकार बनवणाऱ्यांना बाजूला ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. कर्नाटकात 40 टक्क्यांचे सरकार आहे असे म्हटले जाते, पण ही नेमकी काय भानगड आहे कळायला मार्ग नाही असा खोचक टोला पवार यांनी भाजपला लगावला.
कर्नाटकातील निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी निपाणी येथे बोलताना शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. पवार म्हणाले, खरेतर अनेक ठिकाणी भाजप सत्तेत निवडून आलेला नाही. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार फोडून त्यांनी सत्तांतर केले. मध्य प्रदेश आणि अशी अनेक राज्ये सांगता येतील जिथे धनाचा वापर करून माणसे फोडणे आणि त्यातून सरकार बनवणे ही भूमिका देशातील सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे. त्याला कर्नाटकही अपवाद नाही. म्हणून या देशात पैशाचा वापर करून राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला खडय़ासारखे बाजूला करण्याची वेळ आली आहे.
कर्नाटकात सध्या 40 टक्क्यांसंबंधीच्या नवीन धोरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. हे धोरण संपूर्ण देशात राबवण्याची इच्छा काहींची दिसते. कर्नाटकची आजकर इतकी बदनामी कुणीही केली नाही जितकी भाजप सरकारने केली. मिळालेली सत्ता सामान्य माणसासाठी वापरायची असते. पण तसे कर्नाटकात झाल्याचे दिसत नसल्याचे पवार म्हणाले.
कुठे थांबायचे हे कळले नाही की अपघात होतो!
निवडणुकीत चावी देणारे लोक खूप असतात, पण कुठे थांबायचे हे कळले नाही की अपघात होतो, असा टोला शरद पवार यांनी कॉँग्रेस उमेदवार काका पाटील यांना लगावला. माझ्याकडे 10 वर्षे कृषी खाते होते. 72 हजार कोटी कर्जमाफी केली, व्याजाचे दर 3 टक्क्यांकर आले. उत्तम पाटील यांना निवडून द्या, येथील उसाला दर वाढवून देण्याबाबत मार्गदर्शन करू, असे ते म्हणाले.
मणीपूर शांत करण्याचे सोडून मोदी कर्नाटकात
देशभरात अनेक समस्या आहेत. सीमेवरील राज्यात शांतता असावी, असे प्रत्येक सरकारचे धोरण असावे. मणिपूरला गेल्या सहा दिकसांपासून संघर्ष सुरू आहे. तेथे भाजपचे राज्य आहे. हातात देशाची सत्ता असूनही त्यांना मणिपूर राज्य सांभाळता येत नाही. तेथील प्रश्न सोडवायचे सोडून पंतप्रधान कर्नाटकमध्ये अखंड फिरत आहेत, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
































































