ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्याकडूनच काढून दुसऱ्याला दिला, हे असं कधी घडलं नव्हतं! शरद पवार यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्याकडून काढून दुसऱयाला दिला हे असे कधी घडलं नव्हतं. विधानसभा अध्यक्षांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखली नाही आणि ते राखतील असे वाटतही नव्हते. असा निर्णय त्यांनी शिवसेनेबाबतीतही घेतला होता. त्याच निर्णयाची आमच्याबाबत पुनरावृत्ती झाली. हा निर्णय सेटलमेंट करून घेतल्याची घणाघाती टीका आज राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घडय़ाळ हे चिन्ह हातातून गेल्यावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच बारामतीत आल्यानंतर निवडणूक आयोगासह विधानसभा अध्यक्ष आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत असाच निर्णय येईल अशी आम्हाला खात्री होती. हा निर्णय घेताना विधानसभा अध्यक्षांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. पक्ष आणि चिन्ह गेले म्हणजे संघटनेचे अस्तित्व संपत नाही. लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे. मी आतापर्यंत 14 निवडणुका लढलो. त्यात पाच निवडणुकांमध्ये चिन्हं वेगवेगळी होती, असेही त्यांनी नमूद केले.

सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोग पिंवा विधानसभा अध्यक्षांनी घेतलेली भूमिका अन्यायकारक आहे, असे ते म्हणाले. पदाचा गैरवापर कसा होतो हे देशासमोर आणणारा हा निर्णय आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात वरच्या कोर्टात जाण्याचा आमच्याकडे पर्याय होता. त्यामुळे आम्ही कालच सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण दाखल केल्याचेही शरद पवार म्हणाले. आगामी निवडणुकीपूर्वी याबाबत निर्णय द्यावा, अशी विनंती न्यायालयाला केली असल्याचेही ते म्हणाले.

‘त्यांचा’ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न!
संपूर्ण पवार कुटुंब आपल्याला एकटे पाडत असल्याच्या अजित पवार यांच्या वक्तव्याचा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. संपूर्ण कुटुंब एका बाजूला एकत्र असताना मी एकटा असल्याचे सांगणे याचा अर्थ लोकांसमोर सतत भावनात्मक भूमिका मांडून त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा टोलाही त्यांनी अजित पवार यांना लगावला.

मरेपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार, भाजपला हरवणार
आमच्या रक्तातच काँग्रेस आहे. त्यामुळे काही झालं तरी मरेपर्यंत काँग्रेस सोडणार नाही. आम्ही आमचे उमेदवार निवडून आणण्याची आणि जी आमची माणसं भाजपमध्ये गेली त्यांना परत आणण्याची ताकद आमच्यात आहे. आणि आम्ही ते करून दाखवणार. त्यामुळे मी शेवटपर्यंत काँग्रेससोबतच राहणार आणि भाजपला हरवणार, असे कॉँग्रेस नेत्या प्रणीती शिंदे यांनी ठणकावून सांगितले.

लातूरला जातोय, नको तो अर्थ काढू नका
देशमुख कुटुंबीय भाजपमध्ये प्रवेश करणार ही अफवा असून, या चर्चा प्रसारमाध्यमातूनच आम्हाला ऐकायला मिळतात. त्यामुळे प्रसारमाध्यमांची सूत्रे काय आहेत ते माहीत नाही. मी माझ्या लातूर येथील एका नियोजित कार्यक्रमाला जात असून, याबाबत वेगळे तर्क लावू नका’, असे कॉँग्रेस नेते अमित देशमुख यांनी स्पष्ट करत कॉँग्रेस सोडण्याची चर्चा फेटाळून लावली.