
सामना ऑनलाईन, मुंबई
गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर हायकोर्टाच्या यशस्वी मध्यस्थीनंतर आज मिटला. जानेवारीपासूनच कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार, संपाच्या काळात आंदोलन करणाऱ्या कामगारांविरोधात कोणतीही कारवाई होणार नाही तसेच त्यांचा पगारही कापला जाणार नाही असे आश्वासन बेस्ट प्रशासनाने हायकोर्टात दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. दरम्यान संप मिटल्यानंतर बुधवार सायंकाळपासूनच मुंबईच्या रस्त्यांवर बस धावू लागल्यामुळे त्रासातून मुंबईकरांची एकदाची सुटका झाली.
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी 8 जानेवारीपासून संप पुकारला होता. याचा फटका लाखो मुंबईकरांना बसत असल्याने हा संप त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी करीत अॅड. दत्ता माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी संघटनांची बाजू मांडणाऱ्या अॅड. नीता कर्णिक यांनी कोर्टाला सांगितले की, बेस्ट प्रशासन आणि पालिकेशी थेट वाटाघाटी कधीच यशस्वी होणार नाहीत. त्यामुळे निवृत्त न्यायमूर्तींची मध्यस्थ म्हणून नेमणूक करावी. हायकोर्टाने ही विनंती मान्य करत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती एफ. आय. रिबेलो यांची नियुक्ती केली. निवृत्त न्यायमूर्ती तीन महिन्यांत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर अभ्यास करतील व यावर निर्णय घेतील असे हायकोर्टाने स्पष्ट केले.
20 टप्प्यांत पगारवाढ करा!
बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार 20 टप्प्यांत वाढवा, कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करा, बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करा, बेस्टचे मुख्यालय पालिकेत हलवा अशा विविध मागण्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संघटनेने केल्या होत्या. कामगारांसंदर्भातील कायद्याची जाण असलेले निवृत्त न्यायमूर्ती एफ. आय. रिबेलो कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांवर निर्णय घेणार आहे.
वडाळा आगारातून निघाली पहिली बस
तब्बल नऊ दिवसांनी बेस्टचा संप आज मागे घेण्यात आला. कृती समितीने आज वडाळा आगारात जाहीर सभेत तशी अधिकृत घोषणा केली. त्यानंतर वडाळा आगारातून पहिली बस बाहेर पडली. तब्बल नऊ दिवसांनी आज मुंबईच्या रस्त्यावरून बस धावली आणि संध्याकाळी कामावरून सुटलेल्या चाकरमान्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
यावेळचा संप नऊ दिवस
बेस्टच्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 8 जानेवारीपासून संप पुकारला होता. गेल्या सलग 9 दिवसांपासून हा संप सुरू होता. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या बसगाडय़ा डेपोमध्येच उभ्या होत्या. संप मागे घेतल्यानंतर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 814 गाडय़ा रस्त्यावर धावल्या तर आज मध्यरात्रीपासून मात्र सगळय़ा गाडय़ा आपल्या शेडय़ुलनुसार धावण्यास सुरुवात होईल.
सर्वात जास्त लांबलेला संप
बेस्टमध्ये आतापर्यंत तीनदा संप झाले. त्यात यावेळचा संप सर्वात जास्त लांबला n सन 1997 मध्ये चार दिवसांचा संप झाला होता.सन 2007 मधला संप दोन दिवसांचा होता.
संपाच्या पडद्यामागे आशीष शेलार?
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामागे राजकीय हात असल्याचे कृती समितीच्या सदस्यांनीच मान्य केले आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे घेताना केलेल्या भाषणावेळी कृती समितीचे नेते रंगा सातोसे यांनी काही राजकीय नेत्यांचे आभार मानले. अॅड. आशीष शेलार, मनसेचे नेते राज ठाकरे, कोकणातील नेते नारायण राणे, आमदार कपिल पाटील यांचे या लढय़ात मोठे योगदान असल्याचे ते बोलले. संपाचा तिढा कोर्टात मांडणाऱ्या वकिलांना सर्व माहितीची रसद पुरविणारे रंगा सातोसे यांनी घेतलेल्या या नावांमुळे हा संप म्हणजे शिवसेनेला बदनाम करण्यासाठी केलेली राजकीय खेळी होती हे त्यामुळे सिद्ध झाले आहे.






























































