
सामना ऑनलाईन,मुंबई
संप करून नऊ दिवस लाखो मुंबईकरांना वेठीस धरणारे कामगार नेते शशांक राव यांनी बेस्ट कामगारांची अक्षरशः फसवणूक केली आहे. राव यांनी न्यायालयाच्या आदेशाबाबत कामगारांना खोटी माहिती दिली असे सांगत शिवसेनेने आज राव यांचे पितळ उघड केले. राव यांच्या सांगण्यानुसार बेस्ट कामगारांना पुढच्या पगारात सात हजार नव्हे, तर फक्त 3428 रुपयेच वाढ मिळणार असून संपकाळातला पगार कापणे आणि गुन्हे दाखल न करण्याबाबत न्यायालयाच्या आदेशात काहीही लिहिलेले नाही असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.
शिवसेना प्रवक्ते, आमदार अॅड. अनिल परब यांनी शिवसेना भवन येथे आज पत्रकार परिषद घेऊन शशांक राव यांचा भंडाफोड केला. नऊ दिवसांनंतर संप मागे घेतल्याची घोषणा राव यांनी बुधवारी केली तेव्हा न्यायालयाच्या आदेशाची प्रतही आली नव्हती असे आमदार परब यांनी सांगितले. राव यांनी न्यायालयाच्या आदेशाचा विपर्यास करून बेस्ट कामगारांची दिशाभूल केली असे ते म्हणाले. राव यांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या पगारात सात हजार रुपये वाढ आली तर कामगारांनी मला ती पगाराची स्लिप आणून दाखवावी, मी माझे शब्द मागे घेईन असा दावाही परब यांनी केला. राव यांनी
कामगारांना दिलेली माहिती आणि न्यायालयाचा आदेश यात तफावत असून संपामुळे मुंबईकरांना जो त्रास झाला त्याला सर्वस्वी बेस्ट वर्कर्स युनियन जबाबदार आहे असे परब यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या गेल्या 25 वर्षांच्या सत्ताकाळात कामगार आणि प्रशासन यांच्यामध्ये जेव्हा जेव्हा संघर्ष झाले तेव्हा तेव्हा शिवसेनेने मध्यस्थाची भूमिका बजावली आहे. मुंबईकर जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि कामगारांनाही न्याय मिळावा यासाठी बेस्ट संपातही शिवसेनेने मध्यस्थाची भूमिका बजावली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रशासन आणि कामगार संघटना यांच्यात चर्चा करून सुवर्णमध्य काढला होता. मात्र शिवसेनेला बदनाम करण्यासाठी काही अदृश्य हातांनी राव यांच्यामार्फत कामगारांची माथी भडकवून संप चिघळवला असा आरोप आमदार परब यांनी केला. राव यांचे स्क्रिप्ट कुणीतही दुसऱ्यानेच लिहिले होते, असेही ते म्हणाले. नारायण राणे, कपिल पाटील आणि आशीष शेलार यांनी संपात मदत केल्याचे राव यांनी सांगितले होते. त्यावरून ते अदृश्य हात कोणाचे होते ते समोर आले, असेही परब यांनी सांगितले….यासाठी शिवसेनेने पाठिंबा मागे घेतला
शिवसेना बेस्ट कृती समितीमध्ये कधीच नव्हती. ज्युनिअर कामगारांचा विचार प्राधान्याने व्हावा पण सर्वच कामगारांचे प्रश्न एकत्रितपणे सुटावेत अशी शिवसेनेची भूमिका होती. परंतु राव हे ज्युनिअर कामगारांच्याच मागणीचा आग्रह धरून संप ताणत होते. यातून विसंवाद झाल्याने शिवसेनेने बेस्ट संपाला दिलेला नैतिक पाठिंबा मागे घेतला होता, असेही परब यांनी यावेळी स्पष्ट केले.
राव यांच्यामुळेच विलीनीकरण रखडले
बेस्ट मुंबई महापालिकेत विलीन करण्याचा ठराव कधीच झाला आहे, परंतु राव यांच्या युनियनने त्याला न्यायालयात आव्हान दिल्याने विलीनीकरण रखडले असल्याचे आमदार परब यांनी सांगितले. विलीनीकरणातील काही अटींमुळे कामगार कमी होणार होते. त्या गोष्टीला शिवसेनेने विरोध केला होता असे स्पष्ट करतानाच ‘बेस्ट जगली पाहिजे’ ही शिवसेनेची भूमिका आहे असे परब यांनी सांगितले. याप्रसंगी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, सरचिटणीस रंजन चौधरी, उपाध्यक्ष सुनील मिठबावकर व उमेश सारंग उपस्थित होते.
डराव… डराव…
- 2007 साली नियुक्ती झालेल्या कामगाराला पुढच्या पगारात 7 हजार रुपये वाढीव मिळतील असे आम्ही लेखी घेतले आहे.
- संपात उतरलेल्या कामगारांवर गुन्हे दाखल होणार नाहीत आणि संपकाळातील त्यांचा पगार कापला जाणार नाही.
- कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यास न्यायालयाने तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.
प्रत्यक्षात काय….
- पुढच्या महिन्याच्या पगारात फक्त 3428.78 रुपयेच वाढणार.
- संपात उतरलेल्या कामगारांवर गुन्हे दाखल होणार नाहीत आणि संपकाळातील त्यांचा पगार कापला जाणार नाही असे न्यायालयाच्या आदेशात कुठेही लिहिलेले नाही.
- संप चिघळल्यास बॅकअप प्लॅन पालिकेने तयार ठेवावा, असेही न्यायालयाचे आदेश होते परंतु त्याबाबत राव यांनी काहीच सांगितले नाही.
शिवसेनेला बदनाम करण्यासाठी काही अदृश्य हातांनी शशांक राव यांच्यामार्फत कामगारांची माथी भडकवून संप चिघळवला. राव यांचे स्क्रिप्ट कुणीतरी दुसऱ्यानेच लिहिले होते. नारायण राणे, कपिल पाटील आणि आशीष शेलार यांनी संपात मदत केल्याचे राव यांनी सांगितले होते. त्यावरून ते अदृश्य हात कोणाचे होते ते समोर आले आहे- अॅड. अनिल परब, आमदार





























































